Tigers in Kolhapur : देशभरात आयात केलेल्या चित्त्यांची चर्चा होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये तब्बल 8 पट्टेरी वाघ कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या वाघांची झलक वनविभागाने (conservation reserves) लावलेल्या 22 ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग (Tilari and Dodamarg) येथील जंगलामध्ये वाघांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झालं आहे. हे वाघ गोव्यातील म्हादेई वन्यजीव अभयारण्य आणि कर्नाटकातील काली आणि भीमगड वन्यजीव अभयारण्यातून येतात आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली वनपरिक्षेत्रापर्यंत राधानगरीच्या दिशेने वर जातात आणि परत त्याच मार्गाने जातात.
वाघांची हालचाल टिपण्यासाठी कोल्हापूर वनविभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट या वन्यप्राणीप्रेमी संस्थेने कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने वाघांच्या हालचालींची माहिती घेतली आहे. नोव्हेंबर 2021 ते एप्रिल 2022 पर्यंत दक्षिण कोकण आणि कोल्हापूरमधील तब्बल 22 ठिकाणांवर प्रत्येकी एक कॅमेरा ट्रॅप बसवले गेले. काही ठिकाणी दोन महिने तर काही ठिकाणी सहा महिने वाघांच्या हालचालींवर कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून हालचाली टिपल्या गेल्या. कोल्हापूर कॉरिडॉरमध्ये प्रथमच आठ वाघ दिसून आले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून वाघांची हालचाल टिपली जात होती. नर-मादी वाघांची जोडी या परिसरात असल्याचे आढळून आले होते. याशिवाय आणखीही काही वाघ या भागात असल्याचे स्थानिक रहिवाशांनी दावा केला होता. या भागातील रहिवाशांच्या पशुधनाची वाघांकडून शिकार होत असल्याच्या तक्रारीही वनविभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्यामुळे आता कोल्हापूर वनक्षेत्रात आठ वाघ असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अलीकडेच देशात चित्ता परतला
तब्बल सात दशकांनी भारतीय भूमीत चित्ते परतले आहेत. नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात 17 सप्टेंबर रोजी सोडण्यात आले. आठ चित्त्यांमध्ये 4 मादी आणि 3 नर आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेरला आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडले होते.
शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूरमध्ये चित्त्यांचा राॅयल गेम
'द एन्ड ऑफ अ ट्रेल, द चिता ऑफ इंडिया' या पुस्तकात भारतातील चित्त्यांचा इतिहास मांडण्यात आला आहे. यामध्ये देशातील अनेक संस्थानांचा उल्लेख केला आहे. यामध्ये कोल्हापूर संस्थानचा सुद्धा उल्लेख पुस्तकामध्ये आहे. चित्त्यांकडून कशा पद्धतीने शिकार करून घेतली जात होती, त्यांची निगा कशी राखली जायची, याची माहिती फोटोसह दिली आहे. जवळपास 35 चित्ते शाहू महाराजांच्या काळात शिकारीसाठी पाळले जात असल्याचे सांगितले जाते. कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज तसेच राजाराम महाराजांच्या काळात चित्ते पाळले जात होते. त्यावेळी अनेकदा चित्त्याद्वारे शिकारही केली जात होती.
कोल्हापूरमध्ये चित्ते पाळणारा एक चित्तेवान समुदायच होता
कोल्हापूरमध्ये चित्ते पाळणारा एक चित्तेवान समुदायच होता. इस्माईल चित्तेवान, धोंडी लिंबाजी पाटील हे या समूदायामधील खूप नावाजलेली नावे होती. इस्माईल चित्तेवान हे चित्ते पकडत, सांभाळत असत. त्यांना चित्तेपारधी असंही म्हटलं जात होते. छत्रपती शाहू महाराज त्यांच्या या कलेने प्रभावित झाले आणि त्यांनी राजाश्रय देऊन टाकला.
इतर महत्वाच्या बातम्या