मुंबई : एकनाथ खडसेंनी अखेर भाजपला राम राम ठोकला आणि पुन्हा एकदा फडणवीसांवर तोफ डागली. खडसेंच्या खदखदीचा कडेलोट झाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. पण गेल्या पाच वर्षांत भाजपत असे अनेकजण आहेत, ज्यांना फडणवीसांनी दुखावल्याचं म्हटलं जातं. कोण आणि कसं दुखावलं गेलं त्यावर टाकूयात एक नजर.
'मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री', असं पंकजा मुंडे यांनी जाहीर भाषणात बोलून दाखवलं आणि तिथून त्यांची पक्षात उलटी गिणती सुरू झाली. गोपीनाथ मुंडेंनंतर भाजपमधला बहुजनांचा चेहरा म्हणून पंकजाकडे पाहिलं जात होतं. मात्र, तरीही पंकजा यांना फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात दुय्यम दर्जाचं समजलं जाणारं महिला बाल विकास, जल संधारण आणि ग्राम विकास खातं मिळालं. त्यातही जलयुक्त शिवार हा फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने पंकजा यांच्याकडचं जल संधारण काढून राम शिंदे यांना देण्यात आलं. त्यामुळे पंकजा विरुद्ध देवेंद्र असा संघर्ष प्रथमच चव्हाट्यावर आला.
त्यानंतर निशाण्यावर होते विनोद तावडे. गृहमंत्री बनण्याचं स्वप्न बघणाऱ्या तावडे यांना शिक्षण मंत्री बनवून अडगळीत टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यात भर म्हणजे पुढील काळात मंत्रिमंडळ विस्तारात तावडेंकडून वैद्यकीय आणि प्राथमिक शिक्षण खातं काढून घेण्यात आलं. हे कमी म्हणून 2019च्या निवडणुकीत तर तावडेंना तिकीटच डावलून पुरती नाचक्की करण्यात आली.
... म्हणून राष्ट्रवादीतच जाण्याचा निर्णय घेतला, एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण
तसेच फडणवीसांच्या नेतृत्वात पालकमंत्री म्हणून विदर्भ एकहाती सांभाळणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंचीही तिकिट कापण्यात आली. थेट नितीन गडकरींच्या मध्यस्थीनंतरही बावनकुळेंना न्याय मिळाला नाही आणि त्याचं खापरही फडणवीसांच्या डोक्यावर फोडण्यात आलं.
तिसरे होते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मोदींचे एकेकाळचे अत्यंत निकटवर्तीय असलेले प्रकाश मेहता. SRA मध्ये फडणवीसांच्या नावाने घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर फडणवीसांनी भर सभागृहात हात वर केले आणि मेहतांची लोकायुक्तांमार्फत चौकशी लावली. आता चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचं कारण पुढे करत एकमेव जुना गुजराती चेहरा असलेल्या मेहतांचा 2019 च्या निवडणुकीतून पत्ता कापला.
इतकंच काय तर भाजपची धडाडणारी तोफ अशी ओळख असलेल्या किरीट सोमय्या यांनाही लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी डावलण्यात आली. शिवसेनेवर विशेषतः उद्धव ठाकरेंवरची जहरी टीका यासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. कारण लोकसभेला फडणवीसांना शिवसेनेची साथ गरजेची होती.
अशा पद्धतीने फडणवीस यांनी इतर पक्षातील अनेक दिग्गजांना आयात करून एकीकडे पक्षाचं इलेक्टोरल मेरिट वाढवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे पक्षांतर्गत विरोधकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठूनही विरोधी बाकांवर बसण्याची वेळ भाजपवर आलेली असतांना आता सर्व नव्या - जुण्यांची मोट बांधून ताकदीने मोर्चेबांधणी करण्यासाठी फडणवीसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
Devendra Fadnavis | खडसेंनी धक्का दिल्यानंतर आता फडणवीसांचं सोशल इंजिनीअरिंग