मुंबई : प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनची आई आणि चित्रपट निर्माते राकेश रोशन यांची पत्नी पिंकी रोशन यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. पिंका रोशन यांना सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरीच आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
या वृत्ताला दुजोरा देत 67 वर्षीय पिंकी रोशन यांनी एबीपी न्यूजशी फोनवर बोलताना सांगितले की, खबरदारी म्हणून माझे संपूर्ण कुटुंब आणि घरातील संपूर्ण कर्मचारी दर दोन-तीन आठवड्यांनी कोविड19 चाचणी करत आहेत. अशीच एक चाचणी, पाच दिवसांपूर्वी घेण्यात आली होती, त्यात माझ्या शरीरात कोविड 19 चा अंश सापडला आहे. डॉक्टरांनी मला सांगितले की, गेल्या 15 दिवसांपासून माझ्या शरीरात व्हायरस आहे.
पिंकी रोशन म्हणाल्या, "मला या आजाराची कोणतीही लक्षणे नसल्याने डॉक्टरांनी मला रुग्णालयात न राहता घरी आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे." पिंकी रोशन यांनी सांगितले की, सातव्या दिवशी म्हणजेच उद्या, कोविड -19 ची टेस्ट पुन्हा एकदा घेण्यात येणार आहे.
संजय दत्तने जिंकली कँसर विरोधातील लढाई; ट्विटरवरुन दिली माहिती, म्हणाला..
पिंकी रोशन जुहूच्या 'पलाजो' इमारतीत राहत असून, या क्षणी त्यांची मुलगी सुनयना, नितीन सुनारिका आणि तिची आईही राहत आहेत. पिंकी रोशन यांनी सांगितले की हे सर्व इमारतीच्या वेगवेगळ्या मजल्यांवर राहतात आणि पूर्ण खबरदारी घेत आहेत. तर हृतिक रोशन गेल्या काही वर्षांपासून आई-वडिलांपासून विभक्त जुहू येथील 'प्राइम बीच' येथे राहत आहे. दरम्यान, पिंकी रोशन यांचे पती राकेश रोशन सध्या खंडाळ्यामध्ये आपल्या बंगल्याच्या बांधकामात व्यस्त आहेत. पिंकी रोशन यांनी सांगितले की ते शनिवारी मुंबईला परततील.
आजचं वयाची 67 वर्षे पूर्ण केलेल्या पिंकी रोशन यांनी सांगितले की, मी आयसोलेशनमध्ये असतनाही माझ्या कुटुंबीयांनी मला खूप छान सरप्राईज दिलं. कोरोना पॉझिटिव्ह असतानाही पिंकी रोशन वाढदिवसाचा पूर्ण आनंद घेत आहेत. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. फक्त खबरदारी घ्या असेही शेवटी पिंकी रोशन म्हणाल्या.