मुंबई : देशभरात जवळपास 52 बॉम्बस्फोट घडवून आणलेला कुख्यात दहशतवादी डॉ. जलीस अन्सारीला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे. अन्सारी उत्तर प्रदेशातून नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अजमेर जेलमधून अन्सारी पॅरोलवर बाहेर आला होता, त्यानंतर तो फरार झाला होता.


जलीस अन्सारी एमबीबीएस डॉक्टर असून महापालिकेच्या रुग्णालायत डॉक्टर म्हणून सेवा बजावत होता. अत्यंत हुशार असलेल्या जलील अन्सारीची 1980 च्या सुरुवातीला पुण्यात अब्दुल करीम टुंडा याच्याशी भेट झाली. दोघंही मूळ मालेगावचे असल्याने त्यांची विचारसरणी जुळली. तिथून जलीलचा दहशतवादी होण्याचा प्रवास सुरू झाला. अब्दुल करीम टुंडाला जलीलने गुरू मानलं आणि टुंडाने याची हुशारी पाहून त्याला बॉम्ब बनवण्यास सांगितलं.


'डॉ. बॉम्ब' म्हणून ओळख


भारतात अशांती पसरवण्यासाठी सेनाभवन, गुरुद्वारा, रेल्वे स्टेशन्स, पोलीस स्टेशन्समध्ये बॉम्ब लावण्याचा त्यांचा प्लान होता. 1990 मध्ये याने डॉ.दत्ता सामंत यांच्या परळमधील कार्यालयात स्फोट घडवून आणला. यात एका पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांना टार्गेट करत आझाद मैदान, गावदेवी, भोईवाडा हे पोलीस स्टेशन आणि स्टेट सीआयडी कार्यालय, नायगाव पोलीस हेडक्वार्टर, क्राईम ब्रांचमधील काही युनिट्समधे स्फोट घडवून आणले.


नायगाव पोलीस हेडक्वार्टरच्या स्फोटात एका पोलिसाच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर रेल्वे स्टेशन्सवर स्फोट घडवून आणण्यास त्यांनी सुरुवात केली. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, अशी त्यांची योजना होती. कल्याण, रेरोड, चर्चगेट यासारख्या जवळपास सगळ्याच रेल्वे स्टेशन्सवर याने बॉम्ब प्लांट केल्याची माहिती आहे. मात्र केवळ कल्याण आणि चर्चगेट वगळता इतर कुठेही ब्लास्ट झाले नाही.


सात ते आठ शिवसेना शाखा, त्यानंतर गुरुद्वांरांना टारगेट करत दादरमधील चित्रा सिनेमाच्यासमोरील गुरूद्वारामध्ये त्याने स्फोट घडवून आणले. यावेळी खालिस्तानी चळवळ अत्यंत भरात होती. 1989 ते 1994 या पाच वर्षांत त्याने 52 ठिकाणी स्फोट घडवून आणले. महाराष्ट्राबाहेरही त्याने ब्लास्ट केले, ज्यामधे गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश यांचाही समावेश आहे.


जलील अन्सारीला अटक


1994 मध्ये सीबीआयला फोन टॅपिंगदरम्यान जलीलच्या लोकेशनची माहिती मिळाली. त्यानुसार सीबीआयने मुंबईतील आग्रीपाड्यातून त्याच्या घरी त्याला अटक केली. त्यावेळी त्याच्याकडे एक रिवॉल्वरही मिळाली. तत्कालीन क्राईम ब्रांचचे डीसीपी असलेले राकेश मारिया यांनीही त्याची चौकशी केली. दिवसभराच्या कठोर चौकशीनंतर त्याने 52 स्फोटांची कबुली दिली, ज्यामुळे पोलीसही थक्क झाले.