औरंगाबाद : भाजपची विभागीय आढावा संघटनात्मक बैठक आज औरंगाबदमध्ये सुरु आहे. या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे गैरहजर आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे पुन्हा नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. मात्र पंकजा मुंडे यांची तब्येत ठिक नाही, त्यामुळे त्या येणार नाहीत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित आहेत.


बैठकीत संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात मराठवाड्याच्या जिल्हास्तरीय आढावा घेण्यात येणार आहे. मराठवाड्यात मागील निवडणुकीमध्ये झालेल्या कामगिरीबाबत तक्रारींबद्दल चिंतन केले जाणार आहे. बैठकीच्या सुरुवातीला पंकजा मुंडे उपस्थित नाहीत. त्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाली आहे. मात्र संध्याकाळी बीड जिल्ह्याच्या बैठकीला त्या उपस्थित राहतील का? हा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे.


भाजपची आजची बैठक संघटनात्मक आहे. आम्ही आढावा घेऊन संघटनात्मक बदल करणार आहोत. आगामी निवडणुकांचाही आढावा घेत आहोत. सहा महिन्यावर औरंगाबाद महापालिका निवडणूक आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे, शिवसेना-भाजपने येथे हिंदुत्वाचं रक्षण केलं. मात्र आता शिवसेनेला याचा विसर पडला आहे. त्यामुळे लोकांचा विकास करण्यासाठी आम्ही निवडणूक स्वतंत्र लढणार आहोत, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.


पंकजा मुंडे यांना बैठकीचं निमंत्रण होतं, मात्र माझी तब्येत ठिक नाही, असं त्यांनी मला सांगितलं. त्यांनी माझी परवानगी घेतली, त्यामुळे मी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला. त्यांना 12 तारखेच्या कार्यक्रमाचीही तयारी करायची आहे, त्यामुळे 12 तारखेला त्यांची भेट होईल, असंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.


नवीन सरकार सुडाचं राजकारण करत आहे


आधीच्या सरकारच्या योजनांना रद्द करण्याचा सपाटा नव्या  सरकारने लावला आहे. ग्रामीण भागातील रस्ते योजना बंद केल्या, पाण्याच्या योजना बंद केल्या. नक्की यांना काय साध्य करायचं आहे, काय अडचण आहे. दोन पक्षांमधील मतभेदांमुळे विकासाची कामे का थांबवली जात आहेत कळत नाही. सध्या सुरु असलेलं सुडाचं राजकारण योग्य नाही. जे चाललं आहे ते राज्याच्या हिताचं नाही. तुम्ही तत्व गुंडाळून कसे सत्तेत आला आहात, हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही ज्यांच्या सोबत घरोबा केलाय, त्यांच्यापासून सांभाळून राहा, असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी दिला.