जालना: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (District Central Bank) अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणुकीवरून जालन्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी आता गुन्हे दाखल केले आहेत. माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) आणि आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांचे बंधू सतीश टोपे यांच्या घरावर करण्यात आलेल्या दगडफेक प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी स्वतःहून हा गुन्हा दाखल केला आहे. एकूण 18 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ज्यात पाच जणांना अटक देखील करण्यात आली आहे. तर, यात महिला आरोपींचा देखील समावेश आहे. 


शनिवारी जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून राजेश टोपे यांच्या गाडीची काच अज्ञात लोकांकडून फोडण्यात आली होती. त्यानंतर रात्री पुन्हा आमदार बबनराव लोणीकर व सतीश टोपे यांच्या निवासस्थानी अचानक आलेल्या 17 ते 18 जणांनी दगडफेक केली होती. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी जमावाला पांगवले होते. दरम्यान, याप्रकरणी आता पोलिसांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दगडफेक करण्यात तीन महिलांचाही समावेश आहे. दरम्यान, याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.


पोलिसांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल...


जालना जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीतील अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडण्याच्या कारणातून शनिवारी तणाव निर्माण झाला होता. राजेश टोपे यांची गाडी देखील फोडण्यात आली होती. त्यामुळे तालुका ठाण्याच्या पोलिसांनी यशवंतनगर परिसरात बबनराव लोणीकर व सतीश टोपे यांच्या घरासमोर बंदोबस्त तैनात केला होता. परंतु, या वेळी काही जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात दगड घेऊन ऐकमेकांच्या घराचे दिशेने दगडफेक करीत धाक निर्माण केली. या वेळी पोलिस असतानाही दगडफेक करून धाक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, जिल्हादंडाधिकारी जालना यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याची पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेखा तौर, कविता दाभाडे, खांडेभराड, महेश तौर, बबलू कुलकर्णी, फारुख तुंडीवाले, रहीम शेख, दिलीप मोरे, कैलास शेळके, संपत टकले आदी आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


राजेश टोपेंची गाडीही फोडली...


शनिवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. यावरून लोणीकर विरुद्ध टोपे असा वाद पाहायला मिळाला. दरम्यान, याचवेळी राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. अज्ञात तरुणांनी टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करून घोषणाबाजी केली. जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकच्या खाली उभा असलेल्या राजेश टोपे यांच्या गाडीवर ही दगडफेक झाली होती. दरम्यान, या घटनेत टोपे यांच्या गाडीच्या काच्या फुटल्या असून, गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बॉटल देखील सापडलेली आहे. यामागे लोणीकर असल्याचा आरोप टोपे यांनी केला होता. त्यानंतर लोणीकर यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. तर, याचवेळी प्रत्युत्तर म्हणून बाजूलाच असलेल्या सतीश टोपे यांच्या घरावर देखील दगडफेक झाली. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


बबनराव लोणीकरांच्या घरावर दगडफेक, राजेश टोपेंच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप