जालना : माजी मंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटनेनंतर आता माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या घरावर अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. अचानक आलेल्या अज्ञाताच्या घोळक्याने बबनराव लोणीकर आणि त्यांचे बंधू यांच्या घरावर दगडफेक केली आहे. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून हा राडा झाला असल्याचे बोलले जात आहे. तर, राजेश टोपेंच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप लोणीकर यांच्याकडून करण्यात येत आहे. 


आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक झाली असून, यावरून लोणीकर विरुद्ध टोपे असा वाद पाहायला मिळत आहे. यावरून आज दुपारी राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. अज्ञात तरुणांनी टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करून घोषणाबाजी केली. जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकच्या खाली उभा असलेल्या राजेश टोपे यांच्या गाडीवर ही दगडफेक झाली होती. दरम्यान, या घटनेत टोपे यांच्या गाडीच्या काच्या फुटल्या असून, गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बॉटल देखील सापडलेली आहे. दरम्यान, यामागे लोणीकर असल्याचा आरोप टोपे यांनी केला होता. त्यानंतर आता लोणीकर यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. 


आता लोणीकरांच्या घरावर दगडफेक...


जालना शहरात असलेल्या बबनराव लोणीकर यांच्या घरासमोर काही वेळापूर्वी काही अज्ञात लोकांचा घोळका आला आणि त्यांच्याकडून थेट दगडफेक करण्यात आली. तसेच बाजूला असलेल्या बबनराव लोणीकर यांच्या घराच्या शेजारी असलेल्या त्यांच्या भावाच्या घरावर देखील दगडफेक करण्यात आली आहे. यात घराच्या काचा फुटल्या आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. तर, राजेश टोपे यांच्या समर्थकांकडून ही दगडफेक करण्यात आल्याचा आरोप लोणीकर यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे लोणीकर विरुद्ध टोपे असा वाद तापल्याचे पाहायला मिळत आहे. 


टोपेंच्या भावाच्या घरावरही दगडफेक...


राजेश टोपे यांची गाडी फोडल्याच्या घटनेनंतर आक्रमक झालेल्या टोपे समर्थकांनी लोणीकरांच्या घरावर हल्ला केला केल्याचा आरोप होत आहे. यावेळी बबनराव लोणीकर आणि त्यांच्या भावाच्या घरावर दगडफेक करण्यात आली. दरम्यान, याची माहिती मिळताच लोणीकर समर्थक देखील घटनास्थळी दाखल झाले. तसेच, लोणीकरांच्या घराच्या बाजूला असलेल्या राजेश टोपे यांच्या भावाच्या घरावर लोणीकर समर्थकांनी दगडफेक केली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः दाखल झाले असल्याची माहिती देखील मिळत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! राजेश टोपेंच्या गाडीवर हल्ला, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वादातून दगडफेक