Lok Sabha Election 2024 : जालना लोकसभा मतदारसंघातून (Jalna Lok Sabha Constituency) पुन्हा एकदा म्हणजेच सहाव्यांदा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता दानवे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) कोण उमेदवार असणार अशी चर्चा सुरु आहे. अशात माजी आमदार तथा काँग्रेसचे नेते कल्याण काळे (Kalyan Kale) यांना महाविकास आघाडीतून काँग्रेस (Congress) पक्षाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मुंबई दौऱ्यानंतर काळेंच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे 2009 मध्ये देखील कल्याण काळे यांनी दानवे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्यांचा 8 हजार 482 मतांनी पराभव झाला होता.
जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे असा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. काँग्रेसकडून कल्याण काळे याना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर काळेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 2009 ला काळे विरुद्ध दानवे अशी लढत पाहायला मिळाली होती. ज्यात रावसाहेब दानवे यांना 3 लाख 50 हजार 710 मते म्हणजेच 44 टक्के मतदान झाले होते. तर, दुसरीकडे कल्याण काळे यांना 3 लाख 42 हजार 228 मते म्हणजेच 42 .93 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे 8 हजार 482 मतांनी काळे यांचा पराभव झाला होता.
(कल्याण काळे-Kalyan Kale)
जालना लोकसभा मतदारसंघ कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला...
1996 पासून जालना लोकसभा मतदारसंघ 2019 पर्यंत म्हणजेच सलग सातवेळा भाजपच्या ताब्यात राहिला आहे. 1996 ते 1999 पर्यंत उत्तमसिंह पवार दोनदा भाजपच्या तिकीटावर जालन्यातून खासदार झाले. तर, 1999 पासून आतापर्यंत पाच वेळा रावसाहेब दानवे सलग भाजपकडून निवडून आले आहेत. त्यामुळे जालना आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. मात्र, कधीकाळी हाच जालना लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. कारण 1977 ते 1980 चा काळ सोडल्यास 1957 ते 1989 पर्यंत सलग हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. मात्र, 1996 साली उत्तमसिंह पवार यांनी भाजपकडे हा मतदारसंघ खेचून आणला आणि तेव्हापासून काँग्रेसला जालन्यात एकदाही लोकसभा निवडणूक जिंकता आली नाही.
मागील निवडणुकीचा निकाल काय होता?
मागील लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यास रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काँग्रेसचे विलास औताडे रिंगणात होते. यावेळी रावसाहेब दानवे यांना एकूण 6 लाख 98 हजार 019 मतदान मिळाले होते, तर विलास औताडे यांना 3 लाख 65 हजार 204 मते मिळाली होती. त्यामुळे दानवे यांचा 3 लाख 32 हजार 815 मतांनी विजय मिळाला होता. परंतु, यंदा काँग्रेसकडून पुन्हा एकदा कल्याण काळे यांच्या नावाचा विचार केला जात असून, त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Raosaheb Danve : ग्रामपंचायत सदस्य ते सहाव्यांदा लोकसभेची उमेदवारी; कोण आहेत रावसाहेब दानवे?