जालना : ओबीसी आरक्षण (OBC Reservation) हे शंभर टक्के धोक्यात आलं असून सत्तेतील निजामी मराठा हा ओबीसी आरक्षणावर उठल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केला. 40 वर्षांनंतर ओबीसींची मूठ आवळण्याचं जालीम औषध जरांगे पाटलांमुळे मिळाल्याचं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा जालन्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमचं आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी ओबीसींनी निर्धार सुरू केला, हा चळवळीचा फार मोठा विजय आहे. आपल्याला आपलं आरक्षण खुटीला बांधू द्यायचं नाही, ही आपली जबाबदारी आहे. आपल्याला वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी समाजाच्या उमेदवाराला मतदान करायचं आहे . ओबीसी समाजाचे आरक्षण 100 टक्के धोक्यात आलेलं आहे. सत्तेत असणारा निजामी मराठा ओबीसींच्या आरक्षणावर उठलाय. 40 वर्षे ओबीसींची मूठ बांधावी असा आमचा प्रयत्न होता, त्याचं जालीम औषध मनोज जरांगे यांनी आम्हाला दिलं. 


ओबीसी आंदोलकांकडून प्रकाश आंबेडकरांचं भव्य स्वागत


ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ही मनोज जरांगे यांच्या होमग्राउंड वरती म्हणजे जालन्यामध्ये दाखल झाली आहे. जालन्यातील मंठा चौफुली भागातून सभास्थळापर्यंत प्रकाश आंबेडकरांच्या या रॅलीचं भव्य स्वागत करण्यात आलं. सभास्थळीदेखील ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आलं.


यावेळी भाषणादरम्यान प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षण धोक्यात असल्याचा आरोप केला. 


जरांगेंचा फोटो घरी लावा


या आधी प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. अकोल्यातील एका सभेत बोलताना ते म्हणाले होते की, मी जरांगे पाटलांचे जाहीर आभार मानतो कारण आम्ही जे 40 वर्षात करू शकलो नाही ते त्यांनी 2 वर्षांत केलं. जरांगेंनी ओबीसींच्या सर्व समाजघटकांत चैतन्य आणि जागृती आणली. ओबीसींना जागं केलं म्हणून सगळ्यांनी जरांगे पाटलांचा फोटो आपल्या घरामध्ये लावायचा आणि विधानसभेच्या निवडणुका जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत एक हार त्याच्यावर चढवायचा, अशा शब्दात मनोज जरांगे यांना खोचक टोलाही लगावला आहे. जरांगेची भूमिका ही 'चीत भी मेरी और पट भी मेरी' अशी आहे.


मनोज जरांगे पाटील  288 जागा लढणार असल्याचं सांगत आहेत. त्यांनी 288 जागा लढवाव्यात आणि गरीब मराठ्यांना न्याय द्यावा असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला. 


ही बातमी वाचा :