जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, याचे पडसाद वेगवेगळ्या ठिकाणी उमटताना पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी राजीनामे देण्याचा निर्णय घेतला असतानाच आता, मराठा आरक्षणाचे पडसाद पोलीस दलात देखील उमटताना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा लागत नसल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट राजीनामा दिला असल्याचे समोर येत आहे. जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने राजीनामा दिला आहे. शिवाजी सटवाजी भागडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
भागडे यांनी जालना पोलीस अधीक्षक यांच्याकडे आपला राजीनामा देतांना म्हटले आहे की, "मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात मराठा समाज उपोषण करीत आहे. तरी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेले नाही. मी सुद्धा मराठा समाजाचा आहे, माझे सुद्धा समाजाप्रती काही तरी देणे लागते म्हणून मी पोलीस कॉन्स्टेबल पदाचा राजीनाम देत आहे. शासनाने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे. माननीय पोलीस अधिक्षक साहेब यांनी माझा राजीनामा मंजुर करावा हि नम्र विनंती, असे भागडे यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहले आहे.
कोण आहेत शिवाजी भागडे?
मराठा आरक्षणासाठी पोलीस दलाच्या नोकरीचा राजीनामा देणारे शिवाजी भागडे हे जालना पोलीस दलात कार्यरत आहे. भागडे यांच्यावर अगोदरच गुन्हेगारी कारवायामध्ये सहभाग आणि मदत केल्याप्रकरणी बडतर्फ करण्याची कारवाई झाली होती. न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा रुजू झाले. तसेच इतर काही कारवाईमध्ये चौकशी देखील सुरू आहे.
जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस...
सरकारला देण्यात आलेली 40 दिवसांची मुदत संपल्याने मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जालना येथील आंतरवाली सराटी गावात उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. विशेष म्हणजे मागील तीन दिवसांपासून जरांगे यांनी पाण्याचा थेंब देखील घेतला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. तर, वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या पथकाला देखील जरांगे यांनी परत पाठवले असून, उपचार घेण्यास नकार दिला आहे. तसेच यापुढे राज्यातील गावागावात आमरण उपोषण करण्याचे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे. तर, कोणालाही काहीही झाल्यास यासाठी सरकार जबाबदार असणार असल्याचे जरांगे म्हणाले. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मराठा आरक्षण! मराठवाड्यातील आत्महत्या सत्र सुरूच; धाराशिव जिल्ह्यात एकाने गळफास घेऊन संपवलं जीवन