छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, राज्यभरात आंदोलन केले जात आहे. दरम्यान, याचवेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांत अनेकांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे. तर, बुधवारी मराठवाड्यात एकाच दिवशी तिघांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालना येथील अंतरवाली टेंभी गावातील शिवाजी किसन माने (वय 45 वर्षे),  छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर (वय 28 वर्षे) आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील देवजना लहू उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर (वय 25 वर्षे) यांनी आपलं जीवन संपवलं आहे. 


पहिली घटना... 


जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी गावात सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी असलेल्या मराठा तरूणाने आत्महत्या केली आहे. उपोषण सुरु असतांना मंडपातून उठून थेट घर गाठत दरवाजाच्या कोंड्याला दोरी लावून गळफास घेत या तरुणाने आत्महत्या केली. शिवाजी किसन माने आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सरकारला वेळ देऊनही मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्याने मुलांचे शिक्षण करू शकत नाही, या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. ही घटना आज गुरवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अंतरवाली टेंभी गावात घडली.


दुसरी घटना... 


छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथे एका मराठा तरुणाने गुरुवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश काकासाहेब कुबेर असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. तसेच. "जोपर्यंत आरक्षण भेटत नाही, तोपर्यंत माझ्या शरीराला जाळू नका," असा मजकूर आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पाटीवर लिहून ठेवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले (चार व सहा वर्षाची ) आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. त्यांना दोन एकर शेती असून या शेतीच्या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह ते भागवत होते. दरम्यान, या घटनेनंतर गावकरी आक्रमक होतांना पाहायला मिळाले. तर, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आपतगाव फाट्यावर रास्ता रोको करून टायर देखील पेटवून देण्यात आले. 


तिसरी घटना...


मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी खिशात लिहून ठेवत एका युवकाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील देवजना येथे गुरुवारी सकाळी घडली. मयत युवकाचे नाव लहू उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर असे आहे. आरक्षणासाठी सरकार वेळ लावत आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरूणांमध्ये नैराश्येचे वातावरण आहे. या नैराश्यातूनच देवजना शिवारातील शेतामधील एका झाडाला लहू उर्फ कृष्णा कल्याणकर याने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे, असा उल्लेख आहे. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


गावबंदी असतानाही ताफा गावात, खासदार प्रताप पाटलांच्या गाड्यांची तोडफोड; गावात पोलिसांचा बंदोबस्त