जालना :  सध्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या (Maratha Reservation Protest)  अनुषंगाने जालना जिल्ह्यात विविध आंदोलनात्मक कार्यक्रम सुरू आहेत, तसेच आज (17 नोव्हेंबर) रोजी अंबड येथे ओबीसी समाजातर्फे ( Jalna OBC Sabha) सभा आयोजित करण्यात आली आहे. या अनुषंगाने अप्पर जिल्हादंडाधिकारी मनीषा दांडगे यांनी जिल्ह्यात जमाबंदीचे आदेश काढले आहे. या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये अधिकाराचा वापर करुन पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे. विशेष म्हणजे, हा आदेश कामावरील कोणताही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही.


सध्या राज्यात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुद्ध विविध कारणांवरून आरोप- प्रत्यारोप सुरू आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे मोर्चे, निर्दशने, रास्ता रोको, आदी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने जालन्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी मनीषा दांडगे यांनी जिल्ह्यात जमाबंदीचे आदेश काढले आहे. त्यामुळे सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. सोबतच, पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. 


काय म्हटले आहे आदेशात?


शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास परिसरात  शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी, भाले, चाकू व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तू जवळ बाळगणार नाही.  दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण देणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप, विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजक माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा पत्रे किंवा कोणतीही वस्तू बाळगणार नाही. असे आदेश दिले आहेत.


संपूर्ण जिल्ह्यासाठी आदेश लागू...


जमाव बंदीचे हे आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजीचे सकाळी 7 वाजेपासून ते  30 नोव्हेंबर रोजीचे 24 वाजेपर्यंत अंमलात राहतील. असेही आदेशात म्हटले आहे.


हे ही वाचा :


OBC Meeting in Jalna : 100 एकरच मैदान, दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त;  जालन्यात 'ओबीसींचा महाएल्गार'