जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी उद्या जालना जिल्ह्यातील अंबड येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने आरक्षण बचाव एल्गार सभेच आयोजन करण्यात आलंय. तब्बल 100 एकरवर ही सभा होणार आहे. विशेष म्हणजे, मराठा आंदोलन पेटलेल्या आंतरवाली सराटीपासून अवघ्या 20 किमी अंतरावर ओबीसी मोर्चाची ही जाहीर सभा उद्या होणार आहे. या सभेला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), महादेव जानकर (Mahadev Jankar), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), शिवाजीराव चोथे (Shivajirao Chothe) यासह ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) आदींची उपस्थितीत असणार आहे.


मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. मात्र, जरांगे यांच्या याच मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. याच, पार्श्वभूमीवर सरकारकडून राज्यभरात मराठा कुणबी नोंदी शोधल्या जात आहे. तसेच, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडणार आहे, त्यांच्या रक्तातील नात्यातील लोकांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. तसेच, आपली ही मागणी 24 डिसेंबरच्या आधी सरकार पूर्ण करणार असल्याचा आश्वासन आपल्याला देण्यात आल्याचा दावा जरांगे यांनी केला. त्यामुळे, मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्यास ओबीसींचा विरोध आहे. आपला हाच विरोध दाखवण्यासाठी अंबड येथे ओबीसी समाजाची भव्य अशी सभा होत आहे. तब्बल 100 एकरवर या सभेची तयारी करण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणी स्टेज लावण्यात आला आहे. सोबतच सभेची संपूर्ण तयारी झाली असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. 


दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त...


मराठा आरक्षणादरम्यान जालना जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना समोर आल्या होत्या. त्यातच, मराठा आरक्षणाला ओबीसींचा प्रचंड विरोध होत आहे. तर, बीड जिल्ह्यात ओबीसी सभेचे बॅनर देखील फाडण्यात आले आहे. त्यामुळे, एकंदरीत ही सर्व परिस्थिती पाहता उद्याच्या सभेत कायदा आणि सुवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी जालना पोलीस घेत आहे. म्हणूनच, उद्याच्या सभेसाठी तब्बल दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.


मनोज जरांगेंच्या बालकिल्ल्यात ओबीसींची सभा...


मनोज जरांगे यांनी जालना येथील आंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केलं होतं. याच ठिकाणाहून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची ठिणगी पडली. त्यामुळे, जरांगेंच्या याच बालेकिल्ल्यात ओबीसींची सभा होत आहे. विशेष म्हणजे, आंतरवाली सराटी गावापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे, उद्याच्या सभेत ओबीसी नेत्यांचा हल्लाबोल कुणावर असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठ्यांचं कल्याण व्हायला लागलं की, पुड्या सोडल्या जातात; राज ठाकरेंच्या टीकेला मनोज जरांगेंच उत्तर