(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray : 'तुम्ही काळजी करुन नका मी आहे तुमच्यासोबत', राज ठाकरेंचा आंदोलकांशी फोनवरुन संवाद
Raj Thackeray : जालन्यातून मनसे नेते बाळ नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना फोन लावला. त्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.
जालना : जालन्यातील घटनेचा संपूर्ण राज्यभरातून निषेध होत असून राजकीय वर्तुळात देखील या घटनचे पडसाद उमटत आहेत. मनसे (MNS) नेते बाळ नांदगावकर यांनी देखील अंतरवालीमध्ये हजेरी लावली आणि आंदोलकांची भेट घेतली. दरम्यान, यावेळी त्यांनी आंदोलक आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी संवाद घडवला. यावेळी राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांना कोणतीही काळजी करु नका. असं म्हटलं आहे.
राज ठाकरेंनी केली जखमींची विचारपूस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी आंदोलनकर्ते जरांगेंशी फोनवरुन संवाद साधला. त्यांनी जखमींची देखील विचारपूस केली. मनसेचे नेते बाळ नांदगावकर हे त्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांनी सुद्धा या आंदोलकांची विचारपूस केली. तसेच, मनसेचा उपषोणकर्त्यांना पाठिंबा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
आंदोलनकर्त्यांनी मांडली व्यथा
आंदोलनकर्ते जरांगे यांनी त्यांची व्यथा देखील राज ठाकरेंजवळ मांडली आहे. यावेळी त्यांनी बोलताना म्हटलं आहे की, आम्हालाच मारुन आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाच ते सहा वर्षांच्या मुलाला देखील मारण्यात आलं आहे. आम्ही शांततेत आमरण उपोषण करत होतो. यावर आम्हाला काय बोलावं हेच कळत नाही. पण हा असा अन्याय आम्ही निजामाच्या काळात देखील पाहिला नव्हता आणि इंग्रजांच्या काळात देखील पाहिला नव्हता. तर यावेळी आंदोलनकर्त्यांना न्याय मिळवून देऊ, असं आश्वासन देखील राज ठाकरे यांनी दिलं आहे.
हे हक्काचं आंदोलन : बाळ नांदगावकर
बाळ नांदगावकर यांनी या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आलो असल्याचं म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, हे आंदोलन कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी नाही तर सामान्य माणसाच्या हक्कासाठी आहे. साहेबांनी त्यांची भूमिका पत्राद्वारे मांडली आहे. त्यामुळे मनसे या आंदोलकांच्या पाठिशी आहे. तर मराठा समाजाने असं कोणतं पाप केलं आहे की, त्यांना आरक्षण दिलं जात नाही, असा सवाल देखील यावेळी बाळ नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. शांततेत सुरु असलेल्या आंदोलनावर अशा प्रकारे लाठीचार्ज करणं, गोळीबार करणं हे कोणत्या कायद्यात बसतं असा प्रश्न बाळ नांदगावकर यांनी विचारला आहे. ज्या पोलिसांनी या लोकांवर लाठीहल्ला केला आहे त्यांना बडतर्फ करण्याची मागणी बाळ नांदगावकर यांनी केली आहे.
राज्यभरात घटनेचे पडसाद
जालन्यामध्ये घडलेल्या घटनेचे संपूर्ण राज्यभरात पडसाद सध्या उमटत असल्याचं पहायला मिळत आहे. सोलापुरात देखील सखल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले आहे. राज्यभरात विविध ठिकाणाहून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. त्यामुळे यावर शासन आता कोणती भूमिका घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर या संपूर्ण प्रकाराची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी सध्या विरोधकांकडून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bhandara News : फडणवीसांवर कारवाई करण्याची दादांमध्ये हिंमत आहे? नाना पटोलेंचा अजित पवारांना सवाल