जालना : मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी मराठवाड्यातील (Marathwada) वेगवेगळ्या जिल्ह्यात 23 जानेवारीपासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने (State Backward Classes Commission) निश्चित केलेल्या निकषानुसार सर्वेक्षणाचे काम युध्द पातळीवर पुर्ण करणे बाबत शासनाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे या सर्वेक्षणाच्या कामासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व महानगर पालीका हद्दीत आयुक्त महानगरपालीका यांना नोडल अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. गोखले इन्स्टीटयुट पुणे (Gokhale Institute Pune) या संस्थेकडून सर्वेक्षण कामकाजाचे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेल्या प्रश्नावलीतील माहिती मोबाईलव्दारे गावपातळीवर नियुक्त केलेले प्रगणक यांच्याकडून भरण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील परभणी (Parbhani), जालना (Jalna), हिंगोलीसह (Hingoli) सर्वच जिल्ह्यात मराठा सर्वेक्षणासाठी प्रशासन सज्ज असल्याचे पाहायल मिळत आहे.
परभणी जिल्ह्यात 3141 प्रगणक व 204 पर्यवेक्षक नियुक्त
मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी परभणी जिल्हयात ग्रामीण भाग व नगर पालीका क्षेत्राकरीता 3141 प्रगणक व 204 पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यात महानगर पालीका क्षेत्रासाठी 705 प्रगणक व 47 पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यवेक्षक व प्रगणक यांना प्रशिक्षण देण्यासाठी परभणी जिल्हात 14 मास्टर ट्रेनर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांना सहाय्य करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी हे सहाय्यक नोडल अधिकारी आहेत. तसेच तालुकास्तरावर तहसिलदार नोडल अधिकारी असून नायब तहसिलदार हे सहाय्यक नोडल अधिकारी आहेत. तसेच, 20 जानेवारी 2024 रोजी नोडल अधिकारी, सहाय्यक नोडल अधिकारी, मास्टर ट्रेनर व तालुकास्तरीय सब ट्रेनर यांचे प्रशिक्षण राज्य मागासवर्ग आयोगाकडून आलेल्या मास्टर ट्रेनर यांच्या मार्गदर्शनातून जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. तसेच 21 व 22 जानेवारी रोजी प्रत्येक तालुक्यात प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. गाव पातळीवर प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या कामास 23 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक प्रगणकाकडून 100 कुंटूबाना भेट देवून प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्यात येणार असून सर्वेक्षण झालेल्या घरावर मार्कर पेनव्दारे चिन्हांकन करण्यात येणार आहे.
जालना जिल्हयातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जालना जिल्हयातील सर्व नोडल अधिकारी तथा तहसीलदार, नायब तहसीलदार व मास्ट्रर ट्रेनर असे एकूण 42 अधिकाऱ्यांना मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्यासाठी करावयाच्या सर्वेक्षणाच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच, 21 व 22 जानेवारी रोजी तालुकास्तरावर प्रगणकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. ज्यात जालना तालुक्यात नियुक्त प्रगणकांची संख्या 292 आणि नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या 21 आहे. अंबडमध्ये नियुक्त प्रगणकांची संख्या 345 व नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या 23 आहेत. भोकरदन नियुक्त प्रगणकांची संख्या 613, नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या 41 असणार आहे. जाफ्राबाद नियुक्त प्रगणकांची संख्या 279, नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या 19 आहे. मंठा तालुक्यात नियुक्त प्रगणकांची संख्या 338 आणि नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या 23 असणार आहे. बदनापूर तालुक्यात नियुक्त प्रगणकांची संख्या 269 व नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या 18 आहे. तसेच घनसावंगी तालुक्यात नियुक्त प्रगणकांची संख्या 483 आणि नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या 32 असणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील 182 पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
हिंगोली जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील 182 पर्यवेक्षकांना जिल्हास्तरीय प्रशिक्षण देण्यात आले. मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाच्या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात 182 पर्यवेक्षक व 3 हजार 575 प्रगणकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यासाठी 55 पर्यवेक्षक व 877 प्रगणक, सेनगाव तालुक्यासाठी 20 पर्यवेक्षक व 444 प्रगणक, कळमनुरी तालुक्यासाठी 39 पर्यवेक्षक व 570 प्रगणक, वसमत तालुक्यासाठी 52 पर्यवेक्षक व 808 प्रगणक आणि औंढा नागनाथ तालुक्यातील 26 पर्यवेक्षक व 896 प्रगणकाचा समावेश आहे. हे सर्व पर्यवेक्षक व प्रगणक घरोघरी जाऊन आवश्यक ती माहिती गोळा करणार आहेत. या सर्व पर्यवेक्षकांना व प्रगणकांना तालुकास्तरावर 21 व 22 जानेवारी रोजी दोन दिवशीय तालुकास्तरीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर 23 जानेवारीपासून प्रत्यक्षात मराठा सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पर्यवेक्षकांना व प्रगणकांना आवश्यक ती माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Maratha Reservation : मनोज जरांगेंची मूळची भूमिका मान्य झाली आहे; दीपक केसरकरांचं वक्तव्य