जालना : मराठा कुणबी नोंदींचा (Maratha Kunbi Records) दुसरा अहवाल शिंदे समितीने (Shinde Committee) सरकारकडे सादर केला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील नोदींची आकडेवारी 'एबीपी माझा'च्या हाती आली आहे. मात्र, याच आकडेवारीवरून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठवाड्यात मराठा कुणबी नोंदी खूप कमी प्रमाणात आढळून येत आहे. काही अधिकारी जाणून बुजून नोंदी शोधत नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. तर, मराठवाड्यात जवळपास 29 हजार नोंदी अढळल्या असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. 


दरम्यान, यावर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "एवढ्या कमी नोंदी कशा सापडू शकतात, त्यामुळे शंका येत आहे. अभ्यासक कमी असून, अभ्यासक वाढवले पाहिजे. 24 डिसेंबरच्या आधी प्रशासन ताकतीने कामावर लागल्यास मराठवाड्यात लाखो नोंदी सापडतील. त्यामुळे यासाठी अभ्यासक वाढवण्याची 'एबीपी माझा'च्या माध्यमातून सरकारला विनंती करतो. तर, काही अधिकारी जाणून-बुजून अहवाल निरंक पाठवत आहेत. काही अधिकारी जातीवाद करत आहेत. त्यामुळे, काही अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून नाही म्हणायचं आणि सरकारने त्यावर विश्वास ठेवायचं असं जमणार नाही," असेही जरांगे म्हणाले आहेत. 


संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर


राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करणे व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे ( निवृत्त) समितीने तयार केलेला अहवाल सोमवारी राज्य शासनास सादर करण्यात आला.  विधानभवनाच्या मंत्रिमंडळ कक्षात हा अहवाल न्या. शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. 


आज विधानभवनात अहवाल पटलावर येण्याची शक्यता... 


शिंदे समितीचा दुसरा अहवाल राज्य शासनास सादर करण्यात आला आहे. तर, शिंदे समितीकडून मराठा कुणबी, कुणबी मराठा आशा तब्बल 54 लाख नोंदी मिळाल्याची अहवालात नोंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, हाच अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर मांडणार आहे. त्यामुळे या अहवालात नेमके कोणत्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे, हे पाहणं महत्वाचे असणार आहे.