जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर सरकारला दिलेली वेळ आता पाळलीच पाहिजे, तसेच गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने दिलेला शब्दही पाळला पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली. त्यावर आरक्षणाच्या विषयावर जरांगे यांनी जरा सबुरीने घ्यावं असा सल्ला राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिला. त्यावर आतापर्यंत सरकारला भरपूर वेळ दिला असं उत्तर जरांगे यांनी दिलं.


मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून शासनाची तयारी कुठपर्यंत आली आहे, शिंदे समितीच्या आतापर्यंतच्या अभ्यासाची माहिती या शिष्टमंडळाने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना दिली. तसेच शिष्टमंडळांने मनोज जरांगे यांच्या तब्येतीचीही चौकशी केली आणि त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळात राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे हे होते. त्यांनी जरांगे यांची रुग्णालयात भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा केली. 


सरकार वेगाने काम करतंय


यावेळी गिरीश महाजनांनी मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाच्या विषयावर सबुरीचा सल्ला दिला. त्यावर आतापर्यंत सबुरी घेऊनच राज्य सरकारला एकूण तीन महिन्यांचा वेळ दिल्याचं जरांगे म्हणाले. त्यावर राज्य सरकार वेगाने काम करत आहे, टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर आणखी जरा वेळ द्यावा अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. काम अंतिम टप्प्यात आलं आहे, सरकार काहीही लपवत नाही असंही महाजन म्हणाले. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले की, सरकार वेगाने काम करतंय त्यामुळेच आतापर्यंत 54 लाख नोंदी मिळाल्या आहेत, पण सरकारने ठरल्याप्रमाणे केलं पाहिजे ही आमची मागणी आहे. 


सरकारचं काय चाललंय ते समजेना


राज्य सरकारचे शिष्टमंडळ आमच्याशी चर्चा करतंय, मीडियासमोर नुसता हा हा करतंय, पण नेमकं काय चाललंय तेच समजेना असं मनोज जरांगे म्हणाले. एकीकडे निष्पापांवरील गुन्हे मागे घेणार असं सरकार म्हणतंय, तर दुसरीकडे आंदोलकांना उचलण्याचं काम पोलिसांकडून सुरूच आहे असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे ठरलेल्या अटींवर सरकारने काम केलं पाहिजे अशी आग्रहाची मागणी मनोज जरांगे यांनी केली.


उपोषण मागे घेताना जे काही कागदावर ठरलेलं आहे ते सगळंच्या सगळं झालं पाहिजे एवढीच मागणी असल्याचं जरांगे म्हणाले. सरकारने नोंदी शोधणं सुरू केलंय, पण मराठवाड्यातील नोंदी शोधण्याचं काम मंदगतीने चाललंय अशी तक्रारही जरांगे यांनी केली. 


ही बातमी वाचा: