जालना: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. गाठीभेटी पक्षांतर, उमेदवार याद्या, उमेदवारी अर्ज भरण्यात येत असून राजकीय क्षेत्रात हालचाली वाढल्या आहेत. अशातच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली.  दोघांमध्ये 20 ते 25 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री उदय सामंत यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे देखील उपस्थित होते.


अंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या घरी ही भेट झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. सर्व पक्षांच्या याद्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर आपले निर्णय, उमेदवार जाहीर करू असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर त्यांनी उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली आहे. या दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. दोघांच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली याबाबत उत्सुकता आहे. मनोज जरांगे पाटील आणि मंत्री उदय सांमत यांच्यात मैत्रीपुर्ण, जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे.


भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया


मी माझ्या काही सहकाऱ्यांचे एबी फॉर्म पक्षामार्फत घेऊन आलो होतो. मी त्यांना विचारलं त्यांना वेळ आहे का, ते दिवसभर कामात व्यस्त असतात. काल मला समजलं आज ते कामातून थोडे मोकळे झाले आहेत, त्यामुळे एक मित्र म्हणून मी त्यांना भेटावं बोलावं या उद्देशाने आलो होतो. रात्री भेटलं तरी बातमी होते, उन्हात भेटलो तरी ब्रेकिंग होते.त्यामुळं करायचं काय हा देखील आमच्यासमोर प्रश्न आहे.आजची चर्चा राजकीय चर्चा नव्हती, मी आलो, त्यांना भेटलो, चर्चा झाली चहा घेतला आणि निघालो, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.


मनोज जरांगेंच्या निवडणूक लढवण्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया


लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहणं किंवा उभं करणं हा एक त्यातला प्रकार आहे.मनोज जरांगे यांना जो प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी जे आंदोलन केलं, त्याच्यावर जर ते उमेदवार उभे करणार असतील तर तो त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या सोबत असणाऱ्यांचा तो अधिकार आहे. त्यामध्ये मला हस्तक्षेप करायचा नाही. या दरम्यान एक मित्र म्हणून देखील चर्चा होऊ शकते, भेट होऊ शकते. या भेटीकडे आणि चर्चेकडे दोन मित्रांनी केलेली चर्चा म्हणूनच बघावं अशी माझी विनंती आहे, असंही यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे. 


जालना -उदय सामंत यांच्या भेटीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया


उदय सामंत यांच्या भेटीवरती मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भेटीवेळी सामाजिक आणि राजकीय विषयावरती चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे. दरम्यान फडणवीस यांनी आरक्षण न दिल्यामुळे 30 तारखेला निर्णय येईल, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. आम्ही जे स्वप्न बघितलं ते पुर्ण झालं नाही, आम्हाला आशा लागली बोती आरक्षणाची ती फडणवीसांनी पुर्ण होऊ दिली नाही. आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ते आरक्षण फडणवीसांमुळं मिळू दिलं नाही, असं म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी हल्लाबोल केला आहे.