जालना: गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर (Pankaja Munde) अनेकदा अन्याय झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. अनेक नेते यावरती अनेकदा भाष्य करतात. मात्र मराठा आरक्षणाच्या आणि इतर मागण्यांसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी देखील आज यावर भाष्य केलं आहे. बीडच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीसांनी संपवलं असं म्हणत जरांगेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ज्यांच्या बापाने भाजप वाढवली त्यांनाच पायाखाली चिरडलं. ज्याच्या बापाने भाजप वाढवलं त्यांनाच या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) संपवलं, मराठ्यांच्या ओढाताणीमुळे त्यांचा दहा वर्षाचा वनवास संपला. हे देवेंद्र फडणवीस डाव खेळतात एवढ्या नीचपणाने सत्ता आणून तुमच्या कुटुंबाला फडणवीस काय सुख मिळणार आहे? अशा शब्दांत जरांगेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.


देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि इतर दोन-तीन जण भाजपला लागलेली कीड आहे असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, देवेंद्र फडणवीस यांची नावं घेत त्यांनी त्यांच्यावर देखील टीका केली आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे, अजित पवार, विनोद तावडे, अशोक चव्हाण, नारायण राणे, निलंगेकर, राणा जगजीत सिंग या सर्वांना धमकावून आणलं असंही ते पुढे म्हणाले आहेत. 


मनोज जरांगे यांचे फडणवीसांवर गंभीर आरोप



माझ्याविरोधात अटक वॉरंट काढणं हा सर्व देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadanvis) खेळ आहे. मला जेलमध्ये टाकून मला मारण्याचा प्रयत्न आहे. बारा तेरा वर्षापूर्वीच वॉरंट आताच का निघालं? तसेच अटक वॉरंट काढण्याची काय गरज होती? मी काय दहशतवादी आहे काय असा सवाल जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपस्थित केला आहे.


देवेंद्र फडणीस हे भाजपला लागलेली कीड आहे, अशी टीकाही जरांगे यांनी केली. माझ्याविरोधात अटक वॉरंट का काढलं याची माहिती मला देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्याच माणसाने दिली. मी याबाबत आता १३ तारखेला बोलणार आहे. सांस्कृतिक खातं, न्याय, पोलीस हे सगळे त्यांच्या हातात आहे. त्यामुळं आता हे सगळं सुरू आहे. फडणवीस आणि भुजबळ यांना दंगली घडवून आणायचा आहेत. मराठा समाजाला माझी एक विनंती आहे की जे मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यासोबत राहू नका. त्यांचा सुपडा साफ करा तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल, असंही जरांगे म्हणाले.


जरांगे निवडणुकीची तयारी सुरू करणार 


सलाईन लावून या ठिकाणी पडून राहण्यापेक्षा पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली बरी. सरकारचा ज्या सत्तेत आणि खुर्चीत जीव आहे, त्याच्यासाठीच्या तयारीला आपण लागलं पाहिजे. सभा, कार्यक्रम, निवडणुका, दौरे, कोणाला निवडून आणायचंं कोणाला पाडायचं, कोणते आमदार विरोधात बोलत आहेत, कोणते खासदार विरोधात बोलत आहोेत त्यांचा बंदोबस्त लावणे गरजेचे आहे, एकच सांगतो मराठा समाजाला कधीही भाजप सत्तेवर येऊ देऊ नका. म्हणून इथं उपचार घेत उपोषण करण्यापेक्षा एक दोन दिवस उपचार घेऊन तयारीला लागणार आहे. आज दुपारी बारा वाजता मी उपोषण स्थगित करणार आहे, अशी माहिती जरांगेंनी (Manoj Jarange) माध्यमांशी बोलताना दिली आहे.