जालना: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून पुन्हा एकदा  मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी उपोषण सुरू केलं होतं. मात्र, त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यासाठी आणि सलाईन लावण्यासाठी गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी आग्रह धरला. त्यानंतर आज मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यांनी यावेळी बोलताना त्यांचं कारण देखील सांगितलं आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची तब्येत ढासळल्याने त्यांना त्यांच्या गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आणि उपचार घेण्याचा, सलाईन लावण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) हल्लाबोल केला आहे. 


देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि इतर दोन-तीन जण भाजपला लागलेली कीड आहे असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, देवेंद्र फडणवीस यांची नावं घेत त्यांनी त्यांच्यावर देखील टीका केली आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे, अजित पवार, विनोद तावडे, अशोक चव्हाण, नारायण राणे, निलंगेकर, राणा जगजीत सिंग या सर्वांना धमकावून आणलं असंही ते पुढे म्हणाले आहेत. 


मनोज जरांगे यांचे फडणवीसांवर गंभीर आरोप



माझ्याविरोधात अटक वॉरंट काढणं हा सर्व देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) खेळ आहे. मला जेलमध्ये टाकून मला मारण्याचा प्रयत्न आहे. बारा तेरा वर्षापूर्वीच वॉरंट आताच का निघालं? तसेच अटक वॉरंट काढण्याची काय गरज होती? मी काय दहशतवादी आहे काय असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.


देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) हे भाजपला लागलेली कीड आहे, अशी टीकाही जरांगे यांनी केली. माझ्याविरोधात अटक वॉरंट का काढलं याची माहिती मला देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्याच माणसाने दिली. मी याबाबत आता 13 तारखेला बोलणार आहे. सांस्कृतिक खातं, न्याय, पोलीस हे सगळे त्यांच्या हातात आहे. त्यामुळं आता हे सगळं सुरू आहे. फडणवीस आणि भुजबळ यांना दंगली घडवून आणायचा आहेत. मराठा समाजाला माझी एक विनंती आहे की जे मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यासोबत राहू नका. त्यांचा सुपडा साफ करा तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल, असंही जरांगे म्हणाले.


जरांगे निवडणुकीची तयारी सुरू करणार 


सलाईन लावून या ठिकाणी पडून राहण्यापेक्षा पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली बरी. सरकारचा ज्या सत्तेत आणि खुर्चीत जीव आहे, त्याच्यासाठीच्या तयारीला आपण लागलं पाहिजे. सभा, कार्यक्रम, निवडणुका, दौरे, कोणाला निवडून आणायचंं कोणाला पाडायचं, कोणते आमदार विरोधात बोलत आहेत, कोणते खासदार विरोधात बोलत आहोेत त्यांचा बंदोबस्त लावणे गरजेचे आहे, एकच सांगतो मराठा समाजाला कधीही भाजप सत्तेवर येऊ देऊ नका. म्हणून इथं उपचार घेत उपोषण करण्यापेक्षा एक दोन दिवस उपचार घेऊन तयारीला लागणार आहे. आज दुपारी बारा वाजता मी उपोषण स्थगित करणार आहे, अशी माहिती जरांगेंनी (Manoj Jarange) माध्यमांशी बोलताना दिली आहे.