जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी 20 जुलैपासून पुन्हा आमदार उपोषण सुरू केलं आहे. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आणि मराठा (Maratha) समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा 4 था दिवस आहे. सोमवारी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर निशाणा साधला होता. तसेच, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौरा केला, पण मराठा आरक्षणावर ते काहीही बोलले नाहीत, त्यावरुन त्यांनी शाह यांच्यावर टीका केली होती. तर, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही इशारा देत, पुढचं उपोषण हे येवल्यात येऊन सुरू करेल, असे जरांगे यांनी म्हटले होते. आता, उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची तब्येत खालावली असून जालन्यातील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय पथक (Doctor) त्यांच्या सेवेसाठी घटनास्थळी दाखल आहे. त्यानुसार, मनोज जरांगे यांचा बीपी व शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

  


उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची जालन्यातील वैद्यकीय पथकाकडून आज दुसऱ्यांदा तपासणी करण्यात आली. उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे यांची शुगर कमी झाली असून रक्तदाबही खालावला आहे. मनोज जरांगे यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. राजेंद्र पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, आम्ही मनोज जरांगे यांची तपासणी केली. सुरुवातीला त्यांचा बीपी 170/174 असायचा. पण, आज त्यांचा रक्तदाब कमी झाला असून 96/68 एवढा बीपी आहे. त्यांची शुगरही कमी झाली आहे. डॉक्टर म्हणून त्यांच्यावर उपचार करणे माझं काम आहे, त्यांनी उपचार घ्यावे यासाठी आम्ही त्यांना विनंती करत आहोत, आमची टीम इथे त्यांच्यासाठी कार्यरत आहे, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. 


शांतता रॅलीच्या माध्यमातून सरकारला इशारा


दरम्यान, गतवेळी उपोषणाला बसल्यानंतर सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर, राज्य सरकारला 1 महिन्यांचा अवधी देत जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. त्यानंतर, हिंगोली जिल्ह्यातून शांतता रॅलीला सुरुवात केली होती. या शांतता रॅलीचा शेवट त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेऊन केला. त्यावेळी, पुन्हा सरकारला इशारा आहे. सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अन्यथा आम्ही 288 मतदारसंघात उमेदवार उभे करू, असे जरांगे यांनी म्हटलं आहे. तर, त्यांनी केलेल्या घोषणेनुसार 20 जुलैपासून ते आमरण उपोषणास बसले असून आज उपोषणाचा 4 था दिवस आहे. त्यामुळे, त्यांची प्रकृती खालावत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. 


हेही वाचा


24 हजारचा स्मार्टफोन आता किती रुपयांना मिळणार?; 'बजेट'च्या घोषणेनंतर स्वस्त झाला मोबाईल, नवे दर 


'बजेट'मधून महाराष्ट्राला काय मिळालं; देवेद्र फडणवीसांनी आकडेवारीसह सांगितलं, ठाकरेंना डिवचलं