जालना: भानावर या आणि आंदोलन गांभिर्याने घ्या, मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) विशेष अधिवेशनाचा घाट कशाला घालताय? आहे त्याच अधिवेशनात चार दिवस वाढवून घ्या आणि आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. जे काही करायचं आहे ते 24 पर्यंत करा, त्यानंतर मात्र एक तासही वाढवून मिळणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
अनेकदा मुदत वाढवून दिली, आम्ही येडे आहे का?
मनोज जरांगे म्हणाले की, हे सरकार विशेष अधिवेशनाच्या नावाखाली वेळकाढू पणा करण्याचा प्रयत्न करतयं. विशेष अधिवेशनाचा घाट घालून वेळकाढूपणा करू नका. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आम्ही त्यामध्ये बसतोय, बाकी कशातून आरक्षण दिला तर ते टिकणार नाही. त्यामुळे बाकी आरक्षण देऊन सरकारने मराठ्यांची फसवणूक करू नये.
सर्व मराठे एकच
राज्यातील सर्व मराठे एकच असल्याचं सांगत मनोज जरांगे म्हणाले की, विदर्भातील मराठे आणि मराठवाड्यातील मराठ्यांचे संबंध आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील मराठे नातेवाईक आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व मराठे एकच आहेत. सध्या आरक्षण हा एकच विषय आहे, त्यामुळे आपापसातील मतभेद बाजूला सारावं आणि मराठा आरक्षणासाठी एकत्र यावं.
आई कुणबी असेल तर अपत्यांना आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. ते म्हणाले की, शिंदे समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे मराठ्यांना आरक्षण द्या. मराठे आणि कुणबी हे एकच असून त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं.
मनोज जरांगेच्या आतापर्यंतच्या मागण्या -
- महाराष्ट्रातील समस्त मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
- मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा.
- मराठा समाजासाठी बलिदान देणाऱ्या 45 बांधवांना सांगितलेला निधी व सरकारी नोकरी द्यावी.
- दर 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवाचा सर्व्हे करावा आणि प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात.
- सारथी संस्थेमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देवून त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावावेत.
- मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिलं तरीही चालेल पण टिकणारं आरक्षण हवं आहे.
- कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी.
- नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या.
- नोंद सापडली पण त्यांना माहीत नसेल तर त्यांच्या घरी जाऊन सांगा.
- नोंदीच्या आधारावर कुटुंबाला आरक्षणात घ्या.
- सर्व नातेवाईक सुद्धा आरक्षणात घेतले पाहिजे.
- रक्ताच्या सर्व नातेवाईकांना आरक्षण दिले पाहिजे.
- शिंदे समितीचे काम सतत सुरू ठेवले पाहिजे.
- ज्या विद्यार्थ्यांनी राज्यभर सारथी, ईडब्लूएस मार्फत शिक्षण घेतले, किमान 13 हजार पेक्षा अधिक निवडी झाल्यात पण नेमणूक नाही, तातडीनं त्यांना नियुक्ती द्यावी.
- मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारला विनंती, तोपर्यंत जर तुम्हाला नोकरभरती करायची असेल तर करा, आमची हरकत नाही पण मराठ्यांच्या जागा रिक्त ठेवून पदं भरा.
- सरकारला पुन्हा विनंती सरकारने नोंदी शोधाव्यात, त्यासाठी भाट लोकांकडे असलेल्या वंशावळी तापसाव्यात, देवीची लस दिली त्यावेळेच्या पण नोंदी आहेत, त्या सुद्धा ग्राह्य धराव्यात.
- आई ओबीसी असल्यास तिच्या मुलांना देखील ओबीसी प्रमाणपत्र द्यावे , सर्व जातीतील आईच्या जातीवरून तिच्या मुलांना प्रमाणपत्र द्यावं, त्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा.
ही बातमी वाचा :