जालना (आंतरवाली सराटी) : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकराने काढलेल्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, जरांगे यांची फसवणूक झाल्याची टीका सोशल मीडियामधून होत असल्याने आता जरांगे संतापले असून, त्यांनी टीका करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. माझ्याविरोधात काहींनी सुपारी घेतलीय, यापुढे ते शांत न बसल्यास त्यांच्या पक्षासह त्यांच्या नेत्यांची नावं उघड करणार असल्याचा थेट इशारा जरांगेंनी दिला आहे. सोबतच 10 फेब्रुवारीपासून आपण कठोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे. आंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


दरम्यान याबाबत बोलतांना जरांगे म्हणाले की, "मराठा समाजाला 70-75 वर्षात जे मिळाले नाही, ते आंदोलनातून मराठा समाजाला मिळाले आहे. हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. मराठा समाजाला विनंती आहे की, माझ्यावर मुंबई आंदोलनाच्या अगोदर पण ट्रॅप रचला जात होता. मुंबईतला ट्रॅप मला अगोदर समजत होता. राज्यात काही 10-20 जण आहेत, जे सरकारची सुपारी घेऊन बोलत असतात. पद आणि पैसे पाहिजे असतील, मात्र ते मिळाले नसल्याने विरोधात बोलत आहे. बहुतेक पक्षाच्या लोकांकडून यांना बोलायला लावले जात आहे. ज्यात बहुतेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोकं आहेत. यापुढे ते गप्प बसले नाही तर मी त्या लोकांच्या पक्षाची आणि त्यांच्या नेत्यांची नावं उघड करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. 


आव्हान दिल्यास ओबीसीचं सर्वच आरक्षण रद्द होते.


मी ट्रॅपला घाबरत नाही आणि मोजत देखील नाही. 57 लाख नोंदी मिळल्यात, जे 75 वर्षात कधीही मिळाल्या नव्हत्या. काही लिहीणाऱ्या लोकांच्या पक्षाच्या लोकांनी 75 वर्षात का आरक्षण दिले नाही. 2001 चा कायदा ओबीसींना आरक्षण देतो. आपण त्याला आव्हान दिल्यास सर्वच आरक्षण रद्द होते. 54 लाख लोकांना प्रमाणपत्र जवळपास वाटप झाले आहेत. त्यामुळे नोंदी सापडलेल्या परिवाराने आता अर्ज करण्याची गरज असल्याचे जरांगे म्हणाले. 


मराठ्यांना कायदा मिळाल्याने काहींना सहन होत नाही...


मुंबईला शांततेत जाऊन आरक्षण घेऊनच येणार अस म्हटलं होतं. सगेसोयऱ्याचा अध्यादेश दोन महिन्यापासून सरकार करत नव्हतं. आंदोलन पुण्यात पोहचताच सरकारकडून हालचालींना वेग आला. 15 तारखेनंतर कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. 75 वर्षात जो कायदा बनला नाही, तो कायदा मराठ्यांनी मिळवला आहे. मात्र, हे सर्व 10-20 जणांना सहन होत नाही. काहींची पोटदुखी आहे. 10 फेब्रुवारीला मी बैठक घेणार असून, त्याच दिवशी मी आमरण उपोषणाला बसणार आहे. मी कुठंही बसलो, चार भिंतीत बसलो, तरीही मी आरक्षणाचा कागद घेऊन आलोय. 10 तारखेला कठोर आमरण उपोषण करणार असल्याने शेवटचं छत्रपतींचे दर्शन घेऊन आलोय, असेही जरांगे म्हणाले आहेत. 


दुही निर्माण करण्यासाठी ट्रॅप लावला जात आहे


काही लोकं स्वतःला अभ्यासक आणि समाजाचे नेते घेऊन मिरवू लागलेत.  सर्व अभ्यासकांनी 10 तारखेला आंतरवाली सराटीय यावेत. त्यांनी मराठ्यात फूट पाडू नयेत. मागासवर्ग आयोग स्थापन झाला हे आंदोलनाचे यश नाही का?, मुख्यमंत्री, सरकारने आरक्षणाची जबाबदारी घेतली आहे. आधी शरद पवार माझ्या पाठीमागे असल्याचे सांगण्यात आले, नंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पाठीमागे असल्याचे सांगितले गेले. दुही निर्माण करण्यासाठी ट्रॅप लावला जात आहे. 40 वर्षांपासून तुम्ही लढत असतांना काय मिळाले. सोशल मीडियावर लिहिणारे ट्रॅप मधलेच आहेत. अधिकारी घाबरायचे म्हणून खोलीत बोललो, बाहेर मला थंडी पण सहन होत नाही. पण आत बोलू की बाहेर बोलू आरक्षण मिळतेय ना?, असेही जरांगे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhagan Bhujbal : अहमदनगरचा मेळावा भविष्यातील मोठ्या क्रांतीची बीजे ठरणार; छगन भुजबळांची पोस्ट चर्चेत