जालना (आंतरवाली सराटी) : मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यातील वाद आता आणखीच टोकाला पोहचला असून, ओबीसी आरक्षणालाच (OBC Reservation) आपण थेट न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा जरांगे यांनी दिला होता. तर, जरांगे यांनी मंडल आयोगाला (Mandal Commission) संपण्यासाठी प्रयत्न करावे आणि त्यांनी न्यायालयात त्याला आव्हान देऊनच दाखवावे, त्यांना माझे चॅलेंज असल्याचे भुजबळ म्हणाले होते. आता भुजबळांच्या याच चॅलेंजला जरांगे यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. मंडल आयोग स्वीकारलेलं नाही, त्यामुळे त्याला चॅलेंज करता येते आणि ते आपण करणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 


दरम्यान यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “सरकारमधील लोकांनी दोन वेगवेगळ्या पद्धतीने स्टेटमेंट करू नयेत. जे करायचे ते दिलखुलास पणे करायचं. 15 ला अधिवेशन आहे, तर नवीन अध्यादेश अंमलबजावणीसाठी 10 पासून आमरण उपोषण सुरु करणार आहे. काहींचे म्हणणे आहे की, मुंबईत जाऊन काय मिळाले. त्यांना सर्वाना मी विनंती करतो त्यांनी आंतरवालीत यावेत. सोबतच सोशल मीडियावर लिहणाऱ्यांनी देखील येऊन काय मिळायला पाहिजे होते हे सांगावं, अभ्यासकांनी देखील यावेळी यावेत, असे जरांगे म्हणाले. 


काहींना टोकरायची सवय 


पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, "मराठवाड्यातील सर्व मराठे कुणबी असल्याचे सरकारने मान्य केले आहे. अध्यादेश घेऊन आलो आहेत, त्यामुळे काही कसे मिळाले नाही. काहींना टोकरायची सवय आहे, पण गोरगरिबांच्या हाताला काही लागलं आहे. पाच पन्नास लोकं विरोधात बोलत आहेत, त्यांना बोलायची सवयच असल्याचे जरांगे म्हणाले. 


भुजबळांवर जोरदार टीका...


दरम्यान याचवेळी छगन भुजबळांवर देखील जरांगे यांनी टीका केली आहे. 'ओबीसीच्या 27 टक्के आरक्षणाला चॅलेंज करणार आहे. मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही, त्यामुळे त्याला चॅलेंज करता येते. भुजबळांनी राजीनामा देऊ की ते राष्ट्रपती होऊ, त्यांचे विचार बदलणार नाही. ओबीसी देखील आमच्यात गुलाल घेऊन नाचत आहेत. नवीन कायद्यानुसार फक्त एक प्रमाणपत्र मिळू दे, मग बघ दिवाळी कशी साजरी करतो. आम्ही ओबीसींच्या दारात नाचत नाही, कारण आम्हीच ओबीसी आहोत. तू फक्त चष्म्याची काच बदल. आरक्षणाच्या नावाखाली त्याला (भुजबळ)  भावनिक वातावरण करायचे आहे. आमच्या ऐवजी दुसरा समाज असता, तर मुंबईत धिंगाणा घातला असता. आम्ही शांततेत गेलो आणि शांततेत आलो असल्याचे देखील जरांगे म्हणाले आहेत. 


बजेटमध्ये आरक्षण देता आल्यास देऊन टाका...


आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देतांना जरांगे म्हणाले की, “ अर्थसंकल्पाबाबत मला काही कळत नाही. ज्याचं बजेट कोलमडलं ते मुंबईला जाऊनही काही मिळाले नाही म्हणत आहे. तर, बजेटमध्ये आरक्षण देता आले तर पटकन देऊन टाकावे, असा खोचक टोलाही जरांगे यांनी लगावला. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


लाख-कोटीमधील फरक कळेना अन् मंडल आयोग संपवण्याची भाषा करतात; भुजबळांची जरांगेंवर टीका