Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेली 5 महिने सतत आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) आज घरी परतणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर 29 ऑगस्टपासून तीन वेळा उपोषणाच्या माध्यमातून सरकारला जेरीस आणणारे मनोज जरांगे आज आपल्या घराचा उंबरठा ओलांडत आत प्रवेश करतील. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आपण घरी जाणार नसल्याचा निर्णय जरांगे यांनी घेतला होता. त्यामुळे तब्बल 5 महिने 3 दिवसांनंतर आज जरांगे आपल्या घरी परतणार आहे. 


मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात 29 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरु केले होते. याच काळात पोलिसांकडून उपोषणास्थळी लाठीचार्ज करण्यात आला आणि याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळाले. दरम्यान, आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका घेत जरांगे यांनी पुन्हा आंतरवालीत उपोषण सुरु केले. विशेष म्हणजे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आपण आता घरी जाणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली होती. त्यानंतर आता मुंबई आंदोलनावेळी सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला आहे. त्यामुळे आज मनोज जरांगे आपल्या घरी जाणार आहेत. 


10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण करणार...


सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, अध्यादेश काढल्यावर सरकारमधील मंत्र्यांकडून दोन वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात असल्याने आम्हाला शंका येत आहे. त्यामुळे सरकराने काढलेल्या अध्यादेशानंतर 9 फेब्रुवारीपर्यंत त्यांना वेळ देण्यात येत असून, त्यांनी या काळात अध्यादेश लागू करावे. अन्यथा मी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे आता सरकारच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 


ओबीसी संघटनांकडून अध्यादेशाला न्यायालयात आव्हान...


मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकराने सगेसोयरे बाबत नवीन अध्यादेश काढला आहे. दरम्यान, याच अध्यादेशाला ओबीसी संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे या अध्यादेशाच्या विरोधात ओबीसी संघटनांकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच, संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरेची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी याचिकेच्या माध्यमांतून भूमिका मांडण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


गाड्याभरून लाठ्या, हेल्मेट अन् शेकडो पोलीस, आंतरवालीत 'त्या' रात्री काय घडलं?; मोठा खुलासा