जालना : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) 20 जानेवारीपासून मुंबईकडे (Mumbai) निघणार असून, पुढे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहे. मात्र, मुंबईला जाण्यापूर्वी मनोज जरांगेंनी मोठा निर्णय घेतला आहे. ज्यात, मुंबईला जाण्यापूर्वी गोदा पट्ट्यातील 123 गावांचा 4 ते 8 जानेवारीदरम्यान दौरा करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान माध्यमांना प्रतिक्रिया देतांना मनोज जरांगे म्हणाले की, 2024 चा संकल्प हा मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडायची नाही, असा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल राग नाही, ते आरक्षणासाठी काम करीत आहेत.मराठा आरक्षणासाठी आमचा लढा आहे. त्यामुळे, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपण इंचभरही मागे हटणार नाही, असेही जरांगे म्हणाले. विशेष म्हणजे, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेतल्या जाणार नाहीत, असेही जरांगे म्हणाले.
गोदा पट्ट्यातील 123 गावांचा दौरा करणार...
मनोज जरांगे यांनी आंदोलनाची सुरवात जालना जिल्ह्यातील गोदा पट्ट्यातून केली होती. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात गोदा पट्ट्यातील गावं सुरवातीपासूनच सक्रीय असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आंतरवाली सराटीमधील 14 ऑक्टोबरला झालेल्या भव्य सभेचा खर्च देखील गोदा पट्ट्यातील 123 गावांनी एकत्रित उचलला होता. त्यामुळे, आगामी मुंबई दौऱ्याच्या आधी मनोज जरांगे या 123 गावांचा दौरा करणार आहेत. तर, या गावातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव मुंबईच्या पायी दिंडीत सहभागी होणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
मुंबईतील मैदानांची पाहणी...
मनोज जरांगे हे 20 जानेवारीला आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघणार आहे. त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करण्याचे जरांगे यांचे नियोजन आहे. मात्र, अजूनही मुंबईतील मैदान निश्चीत झाले नसल्याचे समोर येत आहे. यासाठीच मनोज जरांगे यांच्या एका शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी मुंबईचा दौरा केला. यावेळी मुंबईतील प्रमुख मैदानांची पाहणी या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. तसेच, यावेळी मुंबई येथील मराठा आंदोलक आणि जरांगे यांच्या शिष्टमंडळाची बैठक देखील झाली.
जरांगेंच्या मुंबई दौऱ्यापूर्वी भुजबळांची नांदेडमध्ये भव्य सभा...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहे. यासाठी 20 जानेवारीला ते आंतरवालीमधून मुंबईकडे कूच करणार आहे. दरम्यान, जरांगे यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांची नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथे येत्या 7 जानेवारीला भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या सभेतून भुजबळ नेमकं काय बोलणार आणि कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मराठा vs ओबीसी संघर्ष पेटणार! ओबीसी आणि मराठा समाज एकाच दिवशी मुंबईच्या मैदानात उतरणार