Jalna Hi-Tech Car Theft : बाजारात सध्या अनेक हाय सेक्युरिटी चारचाकी वाहनं आली असून, वाहन चोरीवर लगाम लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील वाहन चोरी करणारी टोळीने यापुढे जात चक्क हायटेक गाडीला अवघ्या तीन मिनिटात अनलॉक करून चोरी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी पिता-पुत्रांना अटक केल्यावर, अख्ख कुटुंबच चोरीच्या व्यवसायात असल्याचं पोलीस तपासात समोर आलाय. तर, हायटेक पध्दतीने काही मिनिटात गाडी लंपास करणारा आरोपी फक्त बारावी पास आहे.


जालना पोलिसांनी कारवाई करत हायटेक पद्धतीने कार चोरणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकले आहे. हे आरोपी सुरुवातीला ओबीडी नावाच्या डिव्हाईसने गाडीचं सेन्सर बंद करतात. त्यानंतर स्क्रू ड्रायव्हर आणि बनावट चावीच्या मदतीने चारचाकी वाहनांची अवघ्या तीन मिनिटात चोरी करतात. ही हायटेक पद्धत बघून पोलीस चक्रावले आहे. यापूर्वी दिल्ली सारख्या शहरात असे काही गुन्हे उघडकीस आले होते. मात्र चोरीची ही हायटेक पद्धत आता महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळते. याप्रकरणी जालना पोलिसांनी, शेख अफजल शेख दाऊद (वय 22 वर्ष), शेख दाऊद ऊर्फ बब्बू शेख मंजूर (वय 56 वर्ष), शेख राजा शेख दाऊद (वय 24 वर्ष), अरबाज शेख दाऊद (वय 18 वर्ष रा. सर्व गुलशननगर चिखली, जि. बुलडाणा), शेख फरदीन शेख युसूफ (वय 19 वर्ष रा. संजयनगर देऊळगावराजा) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. तसेच आरोपींच्या ताब्यातून स्वीफ्ट डिझायर कार, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी, ओबीडी डिव्हाईस, बनावट चाव्या, स्कू ड्रायव्हर असा एकूण 9  लाख 79 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


अशी केली जाते चोरी...?



  • आरोपी ओबीडी हे डिव्हाईस विकत घेतात.

  • डिव्हाईसद्वारे -कारचे लॉक उघडतात. 

  • त्यानंतर स्कू ड्रायव्हरच्या मदतीने कारचा दरवाजा खोलतात. 

  • ओबीडी डिव्हाईस कारला कनेक्ट केले जाते.

  • डिव्हाईस कनेक्ट झाल्यानंतर कारचे सेन्सर बंद करतात. 

  • शेवटी बनावट चावी लावून कारची चोरी होते.


संपूर्ण कुटुंब चोरी व्यवसायात!


याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला अफजल, अरबाज दोघे सख्खे भाऊ आहेत. तर यातीलच आरोपी दाऊद याचे ते मुल आहेत. तर त्याचा तिसरा मुलगा वाहन चोरीच्या गुन्ह्यात बीडच्या कारागृहात आहे. मागील दोन पिढ्यांपासून हे कुटुंब याच व्यवसायात आहे. तर आरोपींनी आत्तापर्यंत 40 पेक्षा अधिक चारचाकी वाहनांची चोरी केल्या असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय.


अशी विकतात चोरीची कार...


हायटेक पद्धतीने कार चोरणाऱ्या या टोळीचा एक वेगळा पॅटर्न आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून कार चोरी करायची. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ती विक्रीसाठी पाठवले जाते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीच्या या गाड्या पंजाबमध्ये विकल्या जातात. चोरी केलेली चारचाकी गाडी अवघ्या साठ हजार रुपयात विक्री केली जाते.