Jalna News: दारूच्या नशेत कोण कधी काय करेल याचा नेम नाही. जालना जिल्ह्यात सुद्धा असाच काही प्रकार समोर आला आहे. माहेरी गेलेल्या बायकोला परत आणा म्हणत, एका तरुणाने दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर चढून तब्बल 4 तास शोले स्टाईलं आंदोलन केले. प्रशासनाने अनेकदा विनंती करूनही तो काही खाली यायल तयार नव्हता, पण नशा कमी होताच हा तरुण गुपचूप खाली उतरला. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील हा तरुण असून, गणपत बकाल असे त्याचे नाव आहे.
झालं असे की, बुधवारी अचानक गणपत दारूच्या नशेत गावातील एका मोबाईल टॉवरवर दुपारी चार वाजेच्या सुमारास चढून बसला. त्यामुळे ग्रामस्थांनी त्याला खाली येण्याचे आवाहन केले. पण त्याने खाली येण्यास नकार दिला. तसेच माहेरी गेलेल्या बायकोला परत आणून द्या तेव्हाच खाली उतरणार असल्याची भूमिका गणपतने घेतली. त्याच्या या मागणीने गावकऱ्यांना धक्काच बसला. पण तरीही काहींनी खाली ये आपण तुझ्या बायकोला घेऊन येऊ असे त्याला आश्वासन दिले. पण बायको स्वतः इथे येईपर्यंत खाली येणार नसल्याची भूमिका गणपतने घेतली.
पोलिसांची एन्ट्री...
गावकऱ्यांनी अनेक विनंत्या करूनही तरुण खाली येत नसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर पोलिसांनी सुद्धा गणपतला खाली येण्यास सांगतिले. मात्र, पोलिसांच्या आवाहनाला सुद्धा त्याने प्रतिसाद दिला नाही. पोलिसांनी अग्नीशमन दलाच्या पथकाला बोलावून घेतले. पण त्यांनाही गणपतने जुमानले नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सुद्धा गणपत समोर हतबल झाली. मात्र तब्बल 4 तासाने नशा कमी होताच तो टॉवर खाली उतरला. गणपत खाली उतरताच पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.