Jalna News: जालना जिल्ह्यात (Jalna District) क्रिप्टो करन्सीचा (Cryptocurrency) मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण आता चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारात उद्योजकाला पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचा जावई विजय झोल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरूनच आता काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) आणि अर्जुन खोतकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान काल अर्जुन खोतकर यांनी केलेल्या आरोपानंतर आज गोरंट्याल यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. खोतकर आणि त्यांच्या जावयाने 'क्रिप्टो'च्या माध्यमातून मलिदा खाल्ला असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला होता. 


क्रिप्टो'च्या माध्यमातून 500 कोटी पेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला असून, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी गुंतवणूकदारांच्या पाठीशी उभे राहणं आवश्यक असताना त्यांनी करन्सीच्या दलालांना पाठिंबा दिल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला गोरंट्याल यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, अर्जुन खोतकर आणि त्यांचे जावई यांनीच गरीब गुंतवणूकदारांच्या पैशावर क्रिप्टोच्या माध्यमातून मलिदा खाल्ला आहे. अंदमानला वर्षातून तीन टूर काढण्यात आल्या होते असा आरोप करत, खोतकर परिवार आणि झोल परिवार क्रिप्टो करन्सीचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीसोबत फिरतानाचे फोटो गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. त्यामुळे आता यावर अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया काय असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


गोरंट्याल यांची चौकशी करण्याची खोतकरांची मागणी...


जालना जिल्ह्यात क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून 500  कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झालाय. त्यामुळे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी देखील लाखो लोकांनी यात गुंतवणूक केली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी अर्जुन खोतकर यांनी केली आहे.तर काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी गुंतवणूकदारांच्या पाठीशी उभे राहणं आवश्यक होते. मात्र त्यांनी असे न करता करन्सीच्या दलालांना पाठिंबा दिला. तर गोरंट्याल यांची भूमिका संशयास्पद असल्याचं सांगत त्यांच्या देखील चौकशीची करण्याची मागणी खोतकर यांनी केली होती.  


राजकीय वातावरण तापले...


दरम्यान जालना जिल्ह्यात समोर आलेल्या क्रिप्टो करन्सीच्या घोटाळ्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. खोतकर यांच्या जावईवर गुन्हा दाखल होताच, संबध नसतांना आमदार  गोरंट्याल यांनी यात उडी घेतली. यावरून त्यांनी खोतकर यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले. त्यांच्या आरोपांना खोतकर यांनी मंगळवारी उत्तर दिले. दरम्यान आता खोतकर यांच्या टीकेला गोरंट्याल यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे हा वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. 


संबंधित बातम्या: 


जालन्यात क्रिप्टोकरन्सीचा 500 कोटींचा घोटाळा, अनेकांची फसवणूक, उच्चस्तरीय चौकशी करा; अर्जुन खोतकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र