Jalna Crime News: जालन्यात (Jalna) एका धक्कादायक प्रकार समोर आला असून, तिरुपती बालाजी देवस्थानात (Tirupati Balaji Temple) सेवेसाठी नेतो म्हणून औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण येथील एका व्यक्तीने जालन्यातील 225 भाविकांची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या भाविकांनी जालन्यातील कदीम जालना पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करून भाविकांची रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. याबाबत 'लोकमत'ने वृत्त दिले आहेत. 


या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, जालना शहरातील समर्थनगर येथील रहिवासी शाम जोशी यांना त्यांच्या परिचयातील एका महिलेने तिरूपती बालाजी येथे सेवेकऱ्यांची आवश्यकता असून, यासाठी इच्छुक भाविकांची नावे कळविण्यास सांगितले. त्यानुसार जोशी यांनी आपल्या मित्र परिवारातील भाविकांना ही माहिती दिली. त्यांच्या माहितीवरून अनेकजण सेवेसाठी जाण्यास तयार झाले. ऑक्टोबर महिन्यात सेवेसाठी जाण्यास तयार असलेल्या भाविकांची पैठण येथील ज्ञानेश्वर निकम यांनी बैठक घेऊन त्यांना सेवेबाबत मार्गदर्शन केले. 


दरम्यान  तिरूपती बालाजी येथे जाण्यासाठी रेल्वे आरक्षण आणि ट्रॅव्हलचा खर्च यासाठी प्रत्येक व्यक्तीला साडेतीन हजार रुपये जमा करण्याचे निकम याने सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून 225 भाविकांनी शाम जोशी यांच्याकडे 7 लाख 87 हजार 500 रुपये जमा केले. तसेच शाम जोशी यांनी ही रक्कम ज्ञानेश्वर निकम यांच्या बँक खात्यावर पाठविली. रक्कम मिळाल्यानंतर ज्ञानेश्वर निकम यांनी 24 जानेवारी रोजी बालाजीला रवाना होण्यासाठी तयार राहण्याचे सांगितले होते. परंतु 25 जानेवारीला केवळ 27 भाविकांची रेल्वे तिकिटे त्यांनी पाठविली. उर्वरित व्यक्तींना 1 फेब्रुवारी रोजी नेण्यात येईल. असे सांगितले. मात्र त्यानंतर त्याने प्रतिसाद देणं बंद केले. 


अखेर पोलिसात गुन्हा दाखल...


पैसे देऊन देखील निकमकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जोशी यांना त्यांचा शोध सुरु केला. त्यानंतर ज्ञानेश्वर निकम हे औरंगाबाद येथे येत असल्याचे कळाल्यावर शाम जोशी व काही भाविक औरंगाबाद येथे गेले. तेथे ज्ञानेश्वर निकम यांची भेट झाल्यावर शाम जोशी व भाविकांनी त्यांना बेगमपुरा पोलिस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्यात त्यांच्याकडून लेखी लिहून घेतले. तसेच घेतलेल्या रकमेचा धनादेश घेतला. परंतु दिलेल्या तारखेला तो वटला नाही. त्यामुळे जोशी यांनी या प्रकरणाची तक्रार कदीम जालना पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. तसेच आपले पैसे परत मिळवून देण्याची विनंती केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Jalna: पंधरा दिवसांपूर्वी साखरपुडा; बोहल्यावर चढण्याआधीच होणाऱ्या बायकोचा गळा चिरला