Jalna Crime News: जालन्यातील (Jalana) मंठा तालुक्यातील बेलोरा तांड्यावर संतापजनक प्रकार समोर आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या तरुणाने, बोहल्यावर चढण्याआधीच आपल्या होणाऱ्या बायकोचा गळा चिरून खून केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, हत्या करणारा तरुण फरार झाला आहे. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली असून, मयत सपना ऊर्फ दीप्ती संदीप जाधव ही अल्पवयीन असल्याचं समोर आले आहेत. तर सुशील पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंठा तालुक्यातील बेलोरा तांडा येथील सपना संदीप जाधव (वय 17 वर्षे) हीच विवाह बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरूड येथील सुशील पवार या तरुणासोबत ठरला होता. सर्वकाही बोलणं झाल्यावर 15 दिवसांपूर्वीच सपना आणि सुशील दोघांचा साखरपुडा झाला. दरम्यान दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी ठरवल्याप्रमाणे शनिवारी मुलाकडील आणि मुलीकडील मंडळी लोणार येथे बस्ता बांधण्यासाठी गेले होते. यावेळी सुशील देखील बस्ता खरेदी करण्यासाठी गेला होता. 


मुलाकडील आणि मुलीकडील मंडळी बस्ता खरेदी करत असतानाच, सुशील तेथून थेट बेलोरा तांडा येथे गेला. यावेळी सपना घरी एकटीच होती. घरी गेल्यावर त्याने सपनावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि दोघांमध्ये वादावादी झाली.  त्यातूनच त्याने सोबत आणलेल्या चाकूने गळा चिरून सपनाची हत्या केली. घरात असलेल्या लहान मुलांनी याबाबत तत्काळ ग्रामस्थांना माहिती दिली. मात्र तोपर्यंत संशयित आरोपी सुशील फरार झाला होता. तर गावकऱ्यांनी याची माहिती सेवली पोलिसांना दिली, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. 


गावकऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला


सुशीलने सपनाची हत्या केल्याची माहिती घरातील मुलांनी गावकऱ्यांना दिली. त्यामुळे गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सपना रक्ताच्या थोरळ्यात पडलेली होती. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन गावकऱ्यांनी बस्ता बांधण्यासाठी गेलेल्या दोन्हीकडच्या मंडळींना वेगळं कारण सांगत तात्काळ बोलावून घेतलं. तर गावात आलेल्या वराकडील मंडळींना एका घरात सुरक्षित कोंडून ठेवलं. त्यामुळे पोलीस येईपर्यंत ते सुरक्षित राहिले. अन्यथा रागाच्या भरात वधुकडील मंडळींकडून अनुचित प्रकार घडला असता.


नातेवाईकांचा ठाण्यात ठिय्या


घटनेची माहिती मिळताच परतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्यासह सेवली पोलीस ठाण्याचे सपोनि उबाळे, सपोनि. योगेश धोंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन भेट दिली. तर मुलीकडील नातेवाइकांनी मृतदेह थेट सेवली पोलीस ठाण्यात आणला. जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह उचलला, अशी माहिती पोलिसांनी दिली.