रायगड : ऑनलाईन खरेदीत ग्राहकांची कशी फसवणूक होते याचा प्रत्यय रायगडच्या पालीत आला आहे. पालीतील एका शिक्षकाने फ्लिपकार्टवरून एक सिलिंग फॅन ऑर्डर केला. पण त्या ठिकाणी त्यांना चक्क विटा पाठवून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. जनार्दन भिलारे असं त्या शिक्षकाचे नाव असून यामध्ये आपल्याला मानसिक त्रास झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. 

पेशाने शिक्षक असलेले जनार्दन भिलारे यांनी फ्लिपकार्टवरून ऑनलाइन शॉपिंगवर सिलिंग फॅन मागवला होता. मात्र या फॅनच्या खोक्यामध्ये त्यांना चक्क विटा पाठवण्यात आल्या. यामुळे ऑनलाईन फसवणुकीचा पुन्हा एकदा प्रकार समोर आला. या प्रकरणानंतर भिलारे यांना  प्रचंड मानसिक त्रास झाला. कंपनीसोबत भांडून तक्रार केल्यानंतर त्यांना त्यांचे पैसे रिफंड देखील करण्यात आले. 

Raigad Pali Online Fraud Case : व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर 

जनार्दन भिलारे या शिक्षकाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील पोस्ट केला आहे. जनार्दन भिलारे यांनी फ्लिपकार्टवर ऑनलाइन बजाज सिलिंग फॅन ऑर्डर केला. त्याप्रमाणे त्यांना डिलिव्हरी तारीख सुद्धा प्राप्त झाली. त्यांना जी वस्तू प्राप्त झाली त्याचा खोका हा बजाज कंपनीच्या फॅनचा होता. मात्र खोका उघडल्यावर फॅन ऐवजी त्यामध्ये चक्क विटांचे तीन तुकडे निघाले.

पैसे परत केले पण... 

या घटनेनंतर भिलारे यांनी यासंदर्भात ऑनलाइन तक्रार दाखल केली. रात्री मोबाईलवर संपर्क केल्यानंतर कंपनीकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. भिलारे यांचा अकाउंट नंबर मागवून त्यावर 2,430 रुपये इतकी घेतलेली रक्कम त्याच रात्री त्यांच्या अकाउंटवर जमा करण्यात आली. पण या सर्व खटापटीत ग्राहक म्हणून जो मानसिक त्रास झाला याला जबाबदार कोण? हा मोठा चिंतेचा प्रश्न निर्माण होतो आहे.

ही बातमी वाचा :