Jalna Crime News: आठवडाभर शाळेत गैरहजर असलेल्या 14 वर्षीय मुलीला पालकांनी शाळेत जाण्याचा तगादा लावल्याने संतापाच्या भरात तिने आपल्या पाच वर्षीय चुलत बहिणीचा बाथरूममध्ये कोंडून ब्लेडने गळ्यावर वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना जालना शहरातील चौधरी नगर भागात समोर आली आहे. या घटनेने जालना शहर हादरला असूनम परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्वरी रमेश भोसले ( वय 7 वर्षे) असे मयत चिमुकलीचं नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना 112 वर फोन आला होता की, जालना शहरातील चौधरी नगर भागात एका घरातील बाथरूममध्ये मुलीचा गळा कापल्याची घटना घडली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत जखमी मुलीला संतकृपा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. यावेळी ईश्वरीच्या हाताला आणि गळ्यावर जखमा असल्याचे पाहायला मिळाले. तसेच तिच्या चेहऱ्यावर देखील वार करण्यात आलेले होते. दरम्यान रुग्णालयात जाताच ईश्वरीचा मृत्यू झालेला होता. 


बाथरूम जाताच दार लावून घेतले...


आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास ईश्वरी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती. यावेळी तिच्या मागोमाग आलेल्या चुलत बहिणीने बाथरूमचा आतून दरवाजा लावून घेतला. त्यानंतर ईश्वरीच्या गळ्यावर आणि हातावर वार केले, यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर बाथरूममध्ये सर्वत्र रक्तच-रक्त पाहायला मिळत होते. अल्पवयीन आरोपी मुलीने ही हत्या का केली याबाबत अजूनही कोणतेही माहिती समोर आलेली नाही. 


शिक्षणासाठी काकाकडे होती राहायला... 


ईश्वरी भोसले (वय 7 वर्षे) ही मुलगी युकेजीच्या वर्गामध्ये खरपुडी रोडवरील एका इंग्लिश शाळेत शिक्षण घेत आहे. ईश्वरीचे आई-वडील शेतकरी असून त्यांनी तिला शिक्षणासाठी जालना येथे चौधरीनगरात राहणाऱ्या काका गणेश भोसले यांच्याकडे शिक्षणासाठी ठेवले होते. त्यामुळे ती आपल्या चुलत्याकडेच राहत होती. ईश्वरीच्या काकाची रक्तलघवी तपासणी लॅब घनसावंगी तालुक्यात असल्याने दररोज ते जालना येथून येणे-जाणे करतात. आज सोमवारी सकाळी ईश्वरी शाळेत जाणार होती. 8 वाजेच्या सुमारास ईश्वरी ही अंघोळीसाठी करण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. 


बाथरूममधील रक्त धुवून काढलं


ईश्वरी अंघोळीसाठी जाताच अल्पवयीन आरोपी मुलगी देखील बाथरूममध्ये घुसली. तिने आधी दरवाजा आतमधून बंद करून घेतला. त्यानंतर तिने ब्लेडने ईश्वरीच्या गळ्यावर, हातावर, मानेवर वार केले. ईश्वरीच्या किंचाळण्याच्या आवाजाने काकू आणि अन्य लोकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी मुलीने आधी बाथरूममधील रक्त धुवून काढलं आणि त्यानंतरच दार उघडले.