Jalna News : टोमॅटो (Tomato) आणि कांद्याला (Onion) बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यातच आता शेतकऱ्यांच्या वांग्यांनाही (Eggplant) बाजारात दर मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील (Jalna District) भोकरदनच्या पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडी बाजारात वांग्याला एक रुपया किलोपक्षाही कमी दर मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे संतप्त वांगी उत्पादक शेतकऱ्याने बाजारात विक्रीसाठी आणलेले वाग्यांचे कॅरेट अक्षरशः रस्त्यावर फेकून दिले. 


आधी अतिवृष्टी आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच सर्वच शेतीमालाचे भाव पडले आहेत. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधी टमॅटोचा दर कोसळले, त्यात कांद्यांना एक रुपयाचा दर मिळेना. अशात आता वाग्यांनाही बाजारात कोणी विचारानासे झाले आहे. भोकरदनच्या पिंपळगाव रेणुकाई येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी  आठवडी बाजारात शेतातील वांगी विक्रीसाठी आणले. मोठ्या अपेक्षाने आलेल्या या शेतकऱ्यांच्या 20 किलो वाग्यांच्या क्रेटला अवघ्या 30 रुपयांचा दर मिळाला. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या वाग्यांची तर शेवटपर्यंत विक्रीच झाली. यावेळी फुकट देऊनही कोणी वांगी घेत नव्हते. त्यामुळे हतबल झालेल्या रामेश्वर देशमुख नावाच्या शेतकऱ्याने व्यापाऱ्याला वांगी देण्यापेक्षा रस्त्यावर फेकून दिले.


एक रुपया किलोचा दर देखील मिळाला नाही...


रामेश्वर देशमुख यांनी खरिपाच्या हंगामात लावलेल्या पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे लावलेला खर्च देखील हाती आला नव्हता. त्यामुळे त्यांनी रब्बीच्या हंगामात वांगेच्या पिकाची लागवड केली. मोठ्या अपेक्षा ठेवत रामेश्वर देशमुख यांनी एक एकर वांगी लागवड केली होती. बाजारात वांगे विक्रीसाठी आणायची असल्याने तोडणीसाठी किमान तीन ते चार मजूर शेतामध्ये लावले होते. सुरवातीला त्यांनी एक ते दीड गुंठ्यातील वांगी बाजारात विक्रीसाठी आणले. मात्र, बाजारात एक रुपया किलोचा दर देखील मिळत नसल्याने व्यापाऱ्यांनी देखील विकत घेण्यास नकार दिला. वांगी कोणीच घेत नसल्यामुळे रामेश्वर देशमुख यांनी अक्षरशः वांगी रस्त्यावर फेकून दिले. 


तीस हजार खर्च अन् भाव एक रुपया...


रामेश्वर देशमुख यांनी एक एकरवर वांगी लावले होते. यासाठी त्यांना तब्बल तीस हजार रुपयांचा खर्च आला होता. मंगळवारचा आठवडी बाजार असल्याने त्यांनी सोमवारी संध्याकाळी अडीचशे ते तीनशे रुपये रोजाने मजूर लावून वांगी तोडले. यावेळी अंदाजे दोन-सव्वादोन क्विंटल वांगी निघाले. त्यात बाजारात नेण्यासाठी गाडीचा वेगळं भाडे द्यावे लागले. बाजारात गेल्यावर मात्र 30 रुपयाला देखील कोणी क्रेट घेत नसल्याने देशमुख हतबल झाले. त्यामुळे अखेर संतापलेल्या रामेश्वर देशमुख यांनी सर्व वांगी रस्त्यावर फेकून दिली. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Jalna : जालना जिल्ह्यातील 15 हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका; 12 हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान