Jalna News: समृद्धी महामार्गासाठी (Samruddhi Mahamarg) जमीन संपादित करताना सुमारे एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचा घोटाळा (Scam) झाला झाला असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. जालना- नांदेड या समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करताना हा घोटाळा झाला असल्याचा आरोप जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी केला आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या सारख्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून या सर्व घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी देखील गोरंट्याल यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना विधिमंडळाच्या सभागृहात त्यांनी ही मागणी केली आहे. गोरंट्याल यांच्या आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे.
विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जालना विधानसभा मतदारसंघातील विविध विकासाचे मुद्दे मांडताना गोरंट्याल म्हणाले की, जालना- नांदेड या समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला अदाईवर ज्या प्रमाणात खर्च होत आहे, त्यापेक्षा कमी खर्च हा महामार्गाच्या कामासाठी लागणार आहे. कारण जालना नांदेड या समृद्धी महामार्गाचा प्लॅन तीन वर्षांपूर्वी लिक झाला होता. हा महामार्ग होणार याची कल्पना असल्यामुळे आणि त्यासाठी कोणत्या भागातील जमिनी संपादित होणार आहे, याबाबत काहींना माहिती मिळाल्याने त्या मंडळीनी तीन वर्षांपूर्वीच बॉण्ड घेऊन या मार्गावर ग्रीन झोनमध्ये असलेल्या जमिनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात खरेदी केल्या होत्या. जमीन खरेदी केल्यावर याठिकाणी रातोरात फळबागा दाखवल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे. तसेच या घोटाळ्यात जालना, परभणी जिल्ह्यातील काहींचा सहभाग असण्याची शक्यता देखील गोरंट्याल यांनी वर्तवली आहे.
गोरंट्याल यांनी सभागृहात उपस्थित केलेले मुद्दे...
- जालना नगर पालिकेला पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळाला नाही. सदर निधी तात्काळ अदा करण्यात यावा.
- जालना येथे सिडको प्रकल्प मंजूर करण्यात यावा.
- जायकवाडी जालना या पाणी पुरवठा योजनेसाठी अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रात नवीन 25 एम.एल.डी. क्षमतेच्या प्रस्तावास मंजूर करावा.
- सोलार प्रकल्पाचा प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्यात यावी.
- जालना नांदेड या समृध्दी महामार्गास माजी केंद्रीय गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे नाव देण्यात यावे.
- समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करताना सुमारे एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचा घोटाळा झाला असून, त्याची चौकशी करण्यात यावी.
इतर महत्वाच्या बातम्या :
Jalna News : एक रुपया किलोपक्षाही कमी भाव, संतप्त शेतकऱ्याने वाग्यांचे कॅरेट रस्त्यावर फेकले