Jalna Unseasonal Rain : मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शनिवारी सिल्लोड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली होती. तर आज सलग दुसऱ्या दिवशीही कृषिमंत्री सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जालना जिल्ह्याच्या (Jalna District) भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्या समवेत आमदार संतोष दानवे देखील होते. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने शासनास अहवाल पाठविण्याचे निर्देश मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यावी अशा सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


भोकरदन, जाफराबाद तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने अतोनात नुकसान झाले आहेत. कृषिमंत्री अब्दुल सत्तार तसेच आमदार संतोष दानवे यांनी आज भोकरदन तालुक्यातील विरेंगाव व महोरा शिवारातील नुकसान झालेल्या कांदा व जाफराबाद तालुक्यातील सावंगी शिवारातील ज्वारी पिकाची पाहणी केली. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. एकही नुकसानग्रस्त पंचनामा पासून वंचित राहू नये अशा ही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हताश न होता, धीर धरावा सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशा शब्दांत मंत्री अब्दुल सत्तार यांनी धीर दिला. 


शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी 


दरम्यान नुकसानीची पाहणी करीत असताना आज देखील विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. आणखी दोन-तीन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची स्थिती कायम राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. या पाहणी दौऱ्यात तहसीलदार सुरुप कंकाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाना कापसे, भोकरदन तालुका कृषी अधिकारी स्वाती कागणे, जाफराबाद तालुका कृषी अधिकारी संतोष गायकवाड हे देखील उपस्थित होते. 


जालना जिल्ह्यात 24 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान 


एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यातील 24 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, एकूण 4 हजार 297 शेतकऱ्यांना अवकाळीचं फटका बसला आहे. ज्यात 45.75 हेक्टरवरील जिरायत पिकांचे नुकसान झाले असून, 2 हजार 50 हेक्टरवरील बागायत आणि 304 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहेत. तर आतापर्यंत 1 हजार 480 हेक्टर म्हणजेच 61 टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.   


इतर महत्वाच्या बातम्या: 


धक्कादायक आकडेवारी! मराठवाड्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 25 जणांचा मृत्यू