जालना: आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारने गेली 15-20 वर्षे आम्हाला फसवले, आता तुमच्याबाबतही तेच होईल. आजपर्यंत सरकार आम्हाला पाणी पाजत होते, आता ते तुम्हालाही पाणी पाजतील, असे वक्तव्य मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले. मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात होते. त्यांना शुक्रवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीला न जाता बीडमधील (Beed) चाकरवाडी येथे जाणार आहेत. तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.


अंतरवाली सराटीमध्ये आता आमचं आंदोलन सुरुच आहे. आता मी इथून चाकरवाडीला जाऊन रुग्णालयात पुन्हा परत येणार आहे. मला इथून कोणी जाण्यासाठी सांगितले किंवा विनंती केलेली नाही. मी तशा गोष्टी ऐकत पण नसतो, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. यावेळी त्यांनी वडीग्रोदी येथे सुरु असलेल्या लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणाविषयीही भाष्य केले. राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे. याबाबत बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटले की, आता आंदोलन करतायत बोलल्यावर सरकारी शिष्टमंडळ येणारच. आंदोलन केलं बोलल्यावर त्यांना याव लागणारच. पण दोघांचीही सारखीच फजिती होणार, हे ध्यानात ठेवा. सरकारने 15-20 वर्षे आम्हाला फसवले. आजपर्यंत ते आम्हाला पाणी पाजत होते, आता तुम्हाला पाणी पाजतील, असा सावधनातेचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी हाकेंना दिला.


दरम्यान,  ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची  भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले आहे. या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, अतुल सावे यांचा सहभाग आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून शिष्टमंडळ जालन्याकडे रवाना झाले. थोड्याचवेळात हे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे जाऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेईल. या भेटीत काय घडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


आणखी वाचा


''मराठवाड्यात जरांगे फॅक्टर नक्कीच चालला'', भाजपची पहिल्यांदाच जाहीर कबुली; माजी मत्र्यांचं मोठं वक्तव्य