छ. संभाजीनगर : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी (OBC) असा संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण आणि सगे-सोयरेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केलं होतं. मात्र, सरकारने 1 महिन्याचा अवधी दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. तर, ओबीसींच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही, हे सरकारने समजावून सांगावे, अशी मागणी करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेल्या 7 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील वडगोद्री येथे उपोषण सुरु केले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज वडगोद्री येथे जाऊन हाकेंच्या उपोषणाला भेट दिली. तसेच, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोनही केला. त्यावरुन, आता मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) वडेट्टीवारांवर निशाणा साधला. तसेच, राज्य सरकारलाही इशारा दिला आहे.   


मराठ्यांची इतकी मुलं गेली मात्र त्या विरोधी पक्षा नेत्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही. पण, आज पाणी आलं, चांगलं आहे.. असे म्हणत जरांगे पाटील यांचा वडेट्टीवारांच्या अश्रूंवर भाष्य केलं. तसेच, राज्य सरकारने 13 तारखेपर्यंत आमच्या ठरलेल्या वाख्येप्रमाणे सगे-सोयरेची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेतून केली.  


''चंद्रकांत पाटील असं म्हणताय की सगे-सोयरे अंमलबजावणी करण्याची गरज नाही, पण आम्ही काय म्हणतोय हे सरकारने लक्षात घ्यावे. मी सरळ सरळ सांगतो मुख्यमंत्री साहेब आणि शंभूराज साहेब आम्ही दिलेली व्याख्या मान्य असेल तरच सगे सोयरे अंमलबजावणी करा. चंद्रकांत दादा म्हणतात तसे करू नका, नाहीतर आमची फसवणूक होईल, ती करू नका, सगे-सोयरेची व्याख्या गेल्यावेळी आलेल्या शिष्ट मंडळासमोरच ठरली आहे. आता पुन्हा फसवणूक करताय का'', असा सवाल मनोज जरांगे यांनी विचारला. तुम्हाला देता येत असेल तर द्या, खोटी अंमलबजावणी करायची असेल तर करू नका. आम्हाला वेड्यात काढू नका. मुंबईतून डझनभर सचिव आले होते तिथं आम्ही व्याख्या लिहून दिली आहे. सुमित भांगे आणि केसरकर होते, मग आता धोके का देताय, असा संतप्त सवालही मनोज जरांगे यांनी विचारला आहे. 


सरसकट कुणबी हीच आमची मागणी


सरसकट कुणबी अशी आमची मागणी होती आणि हीच मागणी आहे, मध्येच काहीतरी खुळ काढताय. त्यात नोंद न मिळालेल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार का तेही सांगा, मगच अंमलबजावणी करा. आतापर्यंत म्हणत होते तुमच्या मागणीप्रमाणे देतो, आता पाटील वेगळी प्रेस घेत आहेत, महाजन वेगळी घेत आहेत.  तरीही, आम्ही 13 जुलैपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवू, त्यानंतर बघू, मी सगळे आरक्षणात घालणार म्हणजे घालणार, अशा शब्दात जरांगेंनी राज्य सरकारला इशाराच दिला आहे. 


14 तारखेनंतर आम्ही आमचं बघू


मराठ्यांच्या नेत्यांनो लाज वाटू द्या, तुमच्या लेकरांना आरक्षण नाही, त्यांना आरक्षण असून ते किती लढतात बघा. तुम्हाला विधानसभेला कळेल, मराठ्यांची किती गरज आहे, आम्ही विश्वास ठेवला आहे. आंदोलन करणारे आपले विरोधक नाही, त्यांना विरोध नाही. मुलींचे पदवीपर्यत शिक्षण मोफत करू म्हणाले करत नाहीच, यांना करायचेच नाही, मराठ्यांना पिळायचे आहे. ते 10 टक्के न टिकणारे आरक्षण मान्य नाही, तसे सगे सोयरे आमची व्याख्या पाहिजे, तुमचं मान्य नाही. 10 टक्के आरक्षण टिकणार नाही 50 टक्क्यांच्या आत आरक्षण पाहिजे, वरचे टिकणार नाही. तुम्ही 13 तारखेला फसवले की तुमचा कार्यक्रम केलाच समजा. 14 तारखेनंतर आम्ही आमचं बघू, काय करायचं ते करू, असाही इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.