जालना : राम (Ram) हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असं वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची जीभ छाटणाऱ्यास धर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित करणार असल्याची घोषणा हिंदू महासभेच्या वतीने करण्यात आली आहे. हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी (Dhan Singh Suryavanshi) यांनी ही घोषणा केली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणी जालन्यात हिंदू महासभा (Hindu Mahasabha) आक्रमक झाली आहे. 


आव्हाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी म्हणाले की, "राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि शरद पवार साहेबांच्या कृपेने जगणारे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणजेच जीतूद्दीन हे काही लोकांना खुश करण्यासाठी, काही लोकांच्या दाढ्या कुरवळण्यासाठी वारंवार भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती, देवी देवतांवर ते टीका टिप्पणी करत असतात. प्रसिद्धीच्या झोक्यात येण्यासाठी ते असे करत असतात. प्रभू रामचंद्र यांच्यासंबंधी आव्हाड यांनी जे काही वक्तव्य केले आहे, प्रभू रामचंद्र भारतीय संस्कृतीचे अस्मिता आहे. हा देश प्रभू रामचंद्र, कृष्ण,बुद्ध, महावीर, गुरू नानक या सर्वांचा आहे. याठिकाणी मारुतीची उपासना केली जाते. ज्या प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षांचा वनवास भोगला, या काळात त्यांनी कंदमुळे, फळ जेवत 14 वर्षे काढले. अशा देव स्वरूप प्रभू रामचंद्र यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका टिप्पणी केली. लाज वाटली पाहिजे,” असे सूर्यवंशी म्हणाले.  


जीभ छाटणाऱ्याला धर्मयोद्धा पुरस्कार...


पुढे बोलतांना सूर्यवंशी म्हणाले की, "बारामतीच्या मटणाच्या तुकड्यावर जगणारे दोन तोंडी जितेंद्र आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्याला हिंदू महासभा सर्वोच्च धर्मयोद्धा या पुरस्काराने पंढरपुरामध्ये सन्मानित करणार आहे. यापुढे भारतीय संस्कृतीवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाही हे हिंदू महासभेच्या वतीने इशारा देत आहोत, असे सूर्यवंशी म्हणाले. 


प्रकाश महाजन यांची टीका...


राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असे आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून त्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. मनसे नेते तथा प्रवक्ता प्रकाश महाजन यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असा साक्षात्कार आव्हाडांना कुठून झाला? असा सवाल करत प्रभू श्रीरामांचा आदर्श घ्या,  समाजात दुही निर्माण होईल असे बेताल वक्तव्य करणाऱ्या आव्हाड, मिटकरी अशांना शरद पवार यांनी बाजूला सारले पाहिजे. शरद पवार हे देखील अशा नेत्यांचे समर्थन करतात का? असा सवाल उपस्थित करतांना मनसे नेते प्रकाश महाजन यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत शरद पवार यांचेवर देखील जोरदार टीका केली.


इतर महत्वाच्या बातम्या: 


मी ओघात बोलून गेलो, पण अभ्यासाशिवाय काही बोलत नाही, तरीही भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो : जितेंद्र आव्हाड