जालना : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सहाव्या टप्प्यातील दौऱ्याला आजपासून सुरुवात होत असून, 4 दिवसाच्या या दौऱ्यात मनोज जरांगे गोदापट्ट्यातील 11 तालुक्यातल्या 123 गावांना भेटी देणार आहेत. जालना (Jalna), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) आणि बीड (Beed) जिल्ह्यातील या 123 गावांना भेटी देऊन मुंबई आंदोलनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे त्यांचा या दौरा महत्वाचा समजला जात आहे. विशेष म्हणजे मुंबई (Mumbai) जाण्यापूर्वीचा त्यांचा हा शेवटचा दौरा असल्याचे देखील बोलले जात आहे. 


दरम्यान, या दौऱ्यापूर्वी बोलतांना जरांगे म्हणाले की, "आजपासून या दौऱ्याला सुरवात होत असून, या दौऱ्यात सभा होणार नाहीत. मुंबईला जाण्याशिवाय पर्याय नाही. आज कॅबिनेटची बैठक असून, सरकार निर्णय घेऊ शकतात. मराठा समाजाच्या 54 लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. त्यामुळे सरकारने मराठ्यांचा आंदोलन गांभीर्याने घेतले पाहिजे. मराठा कुणबी एकच आहेत. तुम्ही 20 जानेवारीची वाट बघू नका, 20 जानेवारीनंतर तुमची आमची चर्चा बंद होणार असल्याचे देखील जरांगे म्हणाले आहेत. 


कुणबी नोंदी मिळाल्यावर देखील प्रमाणपत्र दिले जात नाही...


पुढे बोलतांना जरांगे म्हणाले आहे की, "ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यापैकी काही लोकांचे कुणबी प्रमाणपत्र अजून देण्यात आल्या नाहीत. बीड जिल्ह्यात 13 हजार नोंदी मिळून आल्या असून, केवळ एक हजार प्रमाणपत्र देण्यात आलेत. त्यामुळे, आजच्या कॅबिनेटमध्ये त्याबाबत निर्णय होणे सुद्धा आवश्यक आहे, असे जरांगे म्हणाले आहेत. 


भुजबळ यांच्यावर टीका...


याचवेळी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. “वेड लागलेलं येडपट वेगळं असतं. तुला जर ओबीसीचे वेड लागलं असतं, तर धनगर बांधवांच्या आरक्षणावरती स्पष्ट भूमिका घेतली असती. तुला केसेस मागे घेण्याचं, राजकारणात मोठ-मोठे पद घ्यायचं वेड लागलेले आहे. हा विचित्र माणूस आहे. धनगर आणि वंजारी समाजाला हा पुढे घालत आहे. तुला फक्त स्वतःच्या स्वार्थाच वेड लागलय," असे जरांगे म्हणाले. 


मुंबईच्या आंदोलकांसोबत बैठक...


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानात उपोषण करण्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे. यासाठी 20 जानेवारीला आंतरवाली सराटीमधून जरांगे मुंबईकडे निघणार आहे. त्यामुळे लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी बुधवारी आंतरवाली सराटीमध्ये मुंबई येथील मराठा आंदोलकांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अनेक महत्वाच्या गोष्टीवर चर्चा झाली. मुंबईत कोणत्या मार्गाने प्रवेश करायचा, मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांच्या पिण्याच्या पाण्याची आणि इतर गोष्टीच्या नियोजनाबद्दल देखील चर्चा झाली. यावेळी जरांगे यांनी काही महत्वाच्या सूचना देखील मांडल्या. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Kunbi Records : कुणबी नोंदींसाठी मराठवाड्यातील प्रत्येक गावातील रेकोर्ड तपासले जाणार; मुख्यमंत्र्यांची माहिती