Jalna: जालना जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला असून, पूरपरिस्थितीमुळे वैद्यकीय मदत वेळेत मिळू शकली नाही. त्यामुळे एका तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंबड तालुक्यातील रुई तांड्यावर ही घटना घडली असून, मृत बालकाचं नाव प्रथमेश पवार असं आहे. (Jalna Rain)
नेमकं घडलं काय?
गेल्या दोन दिवसांपासून अंबड तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे गावालगत असलेल्या भद्रायणी नदीला मोठा पूर आला. या पुराच्या पाण्यातून गावाबाहेर जाणारा रस्ता आणि पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला. परिणामी गावातर्फे दवाखान्याकडे जाण्याचा मार्ग बंद झाला. दुर्दैवाने, याच काळात छोटा प्रथमेश आजारी पडला. त्याला तातडीने दवाखान्यात नेण्याची गरज होती. मात्र, नदीला आलेल्या पुरामुळे गाव बाहेर काढता आलं नाही.उपचाराच्या प्रतीक्षेत अखेर प्रथमेशने आजीच्या खांद्यावरच प्राण सोडले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. छोट्या जीवाचा मृत्यू हा गावकऱ्यांसाठी सहन न होणारा धक्का ठरला आहे.
तर, मृत मुलाचे वडील प्रेमदास पवार यांनी हृदय पिळवटून टाकणाऱ्या शब्दांत दु:ख व्यक्त करत म्हटलं, “गेल्या आठ दिवसांपासून लगातार पाऊस सुरू आहे. घराच्या बाहेरही पडता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पोराला खूप दुखत होतं. कसं बस बाहेर काढलं. रस्ताही दिसत नव्हता. अखेर तीन वर्षाचा मुलाने उपचाराअभावी प्राण सोडले.”
संपूर्ण रुई तांड्यात हळहळ
पूरामुळे गावाचा संपर्क तुटल्याने गावकऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात मूलभूत आरोग्य सुविधा आणि पायाभूत सुविधा किती महत्त्वाच्या आहेत, हे पुन्हा अधोरेखित झालं आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर तात्पुरता पूल किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून अशा दुर्दैवी घटना टाळता येतील. पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीने एका कुटुंबाचा आनंद हिरावून नेला आहे. छोट्या प्रथमेशच्या मृत्यूने केवळ त्याच्या घरातच नव्हे, तर संपूर्ण रुई तांड्यात हळहळ व्यक्त होत आहे.