जालना : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी रायगडमधील सोहळ्यात केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून आता त्यावर प्रतिक्रिया देखील येत आहेत. आता रिकामं ठेवू नका...काहीतरी जबाबदारी द्या, असे धनंजय मुंडेंनी म्हटले होते. त्यामुळे, धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केल्याचा राजकीय अर्थ काढण्यात येत आहे. मात्र, मुंडेंच्या या वक्तव्यावरुन आता विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनीही त्यांच्या वक्तव्यावर भूमिका मांडली.
रोजगार हमीच्या कामावर जा म्हणावं, बाराशी खांदायला, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. तसेच, तो माझा प्रश्न नाही, तो राजकीय आणि त्यांचा व्ययक्तिक प्रश्न, असेही त्यांनी म्हटले. मात्र, मराठ्यांना त्रास झाला तर अजित दादाचा कार्यक्रम झाला. इथे मराठ्यांना त्रास झाला तर अजित दादाचा खेळ संपला, असा इशाराही पाटलांनी दिला आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांच्यावरही जरांगे पाटलांनी जोरदार हल्ला चढवला. तो तसेच लोक कामाला लावतो, मग त्याला खेळायला माग रान मोकळं राहतं. तो फुकटात जातींचा उपयोग करून घेतो. तू गरीब जातींचा फुकटात उपयोग करून घेतो, त्याला भारी गेम जमतो बोलून लोक कामाला लावायचे, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांच्या वक्तव्यावर दिली. तसेच, ओबीसीला सर्वात मोठा डाग असेल तर तो छगन भुजबळ. आहे, असेही त्यांनी म्हटले. सगळ्या ओबीसी आणि मराठ्यांचे त्याने वाटोळं केले, त्याला पापाची फेड करावी लागणार आहे. न्यायदेवता त्याच्यासाठी नाही, सर्वांसाठी आहे. जनता नाही जनार्दन नाही, तुकाराम नाही, ना एकनाथ नाही. तुझ्या डोक्यावर पापाचा हात आहे. पापाचा घडा भरला आहे तुझा. तुला अजून खूप भोगावं लागणार असेही जरांगे पाटील यांनी भुजबळांना उद्देशून म्हटले.
खुमासदार उत्तर देईल- धस
हाताला काम द्या, या धनंजय मुंडेंच्या वक्तव्याबाबत आमदार सुरेश धस यांना विचारले असता, मी आज याबाबत बोलणार नाही, प्रचंड पूर माझ्या मतदारसंघात आलेला आहे. खरडून गेलेल्या जमिनीसंदर्भात मी इथे आलेलो आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली. मात्र, दोन दिवसांत मी यासंदर्भात खुमासदार उत्तर देईल, असेही धस यांनी सांगितले.
कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत येऊ नये - दमानिया
धनंजय मुंडे यांना जनतेचा कामापासून दूर ठेवावे असं माझं स्पष्ट मत आहे, त्यांचा आता वेळ जात नाही आहे मला काहीतरी काम द्या, असं साकडं त्यांनी तटकरेंपुढे घातलं आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. पक्षबांधणी आहे, अशी असंख्य कामे आहेत, अशी पक्षाची कामे त्यांनी करावीत. पण, जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत आला नाही पाहिजे, अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली.
हेही वाचा
धनंजय मुंडे म्हणाले, आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया