जालना : जालना शहरात (Jalna)  काही दिवसांपूर्वी सिलेंडरच्या स्फोटात एका तरुण वकिलाचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र सिलेंडरच्या स्फोट झाल्याचा बनाव करून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या वकील पतीची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार जालना पोलिसांनी उघडकीस आणला आहे. 


जालना शहरातील अर्चनानगर भागात 1 सप्टेंबर रोजी जेव्हा शहर आणि देशभरात गणेशोत्सव साजरा होत होता. पोलीस बंदोबस्तात गुंतली होती तेव्हा या घरात सिलेंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाल्याची बातमी पोलिसात आली. या प्रकरणी हद्दीत येणाऱ्या तालुका पोलिसांकडून या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. सुरुवातीला दुर्घटना वाटणाऱ्या या घटनेत वयाने अवघ्या 28 वर्ष वय असलेला तरुण वकील किरण लोखंडेचा मृत्यू झाला होता. तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या किरणच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.


पोलिसांनी पत्नीच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र या घटनेची पहिली शंका त्यांना मयत किरण यांच्या पत्नीवरच आली. विसंगत माहिती आणि तिने केली टाळाटाळ पाहता पोलिसांना संशय आला. या नंतर घटनास्थळी पाहणी केली असता पोलिसांचा संशय अधिकच गडद झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा त्यांना आरोपी मनीषाचा बनाव स्पष्ट दिसू लागला. पत्नी मनिषाने सांगितलेली गॅस सिलेंडरच्या स्फोटाच्या गोष्टीवर पोलिसांना संशय आला. घटनास्थळी मृतदेहाच्या शेजारी असलेले लाकडी देवघर तसेच व्यवस्थित होते. गॅस लिकेज करण्यासाठी आरोपीने काढलेल्या गॅसच्या नळ्या व्यतिरिक्त सिलेंडरदेखील होते. 


या शिवाय आरोपी मनीषा आणि तिच्यासोबत एक व्यक्ती असल्याची  माहिती देखील घराशेजारील cctv च्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. आरोपी मनीषासोबत आणखी एक आरोपी असल्याचं सिद्ध झालं. लोकेशनवरून तिच्या सोबत असलेल्या दुसरा आरोपी तिचा लग्नाअगोदरचा प्रियकर गणेश आगलावे असल्याचं निष्पन्न झालं आणि खरी कहाणी समोर आली. पोलिसांनी या प्रकरणी मयत किरण लोखंडे याची पत्नी मनीषा आणि तिचा प्रियकर गणेश  याला अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलीअसून न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 


पोलिसांच्या माहितीनुसार मयत किरण आणि मनीषा मध्ये 30 तारखेला  रात्री वाद झाला. ज्यात मनिषाने आपल्या पतीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार केला. या शिवाय पती मारामुळे बेशुद्ध झाल्यावर त्याचे नाक तोंड दाबून श्वास रोखला. या कामात तिच्या प्रियकराने देखील मदत केली. या नंतर दोघांनी घटनास्थळावरून पोबारा केला.  मात्र एक दिवसानंतर 1 सप्टेंबर रोजी त्यांनी परत येऊन रात्री प्रेतावर अज्ञात केमिकल टाकून ते पेटवून दिले. शिवाय संशय येऊ नये म्हणून  गॅस सिलेंडरचा गॅस लिक करून स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जो अयशस्वी झाला होता. मात्र आरडाओरड करून तो झाल्याचा बनाव करण्यात आला होता..


पोलिसांनी या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास केल्याने आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराचा हा बनाव उघड झालामात्र प्रेमाच्या या त्रिकोणात एका व्यक्तींचा आणि आपल्या क्षेत्रात  काही भव्य दिव्य करू इच्छिणाऱ्या उमेदीच्या वकिलाचा निष्कारण मृत्यू झाला हे दुर्दैवीच आहे.