जालना : जालना (Jalna News) जिल्ह्यातील देवमूर्ती गावातल्या शाळकरी मुलाने शेतकऱ्यांसाठी बंदूक बनवलीय, वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने नववीत शिकणाऱ्या ज्ञानेश्वर खडके या विद्यार्थ्यांने हा प्रयोग केला आहे. शेतात राबणाऱ्या वडिलांना वन्य प्राण्यांमुळे होत असलेला मनस्ताप पाहून त्याने ही बंदूक बनवण्याचा निश्चय केला होता. 


PUC पाईप, प्लॅस्टिक बॉटल, छोटी दुर्बिण,असे साहित्य त्याने वापरलंय. बंदूक वजनाने अत्यंत हलकी असून सायकलच्या टायरमध्ये हवा भरणाऱ्या पंपाच्या साह्याने या बंदुकीला एअर प्रेशर दिलं जातं. पुढे पाईप मध्ये पुठ्ठ्यापासून तयार केलेली बुलेट लावली जाते. त्यामुळे बटन दाबताच हवेच्या प्रेशरने ही गोळी आवाज करत वेगाने बाहेर पडते, त्यामुळे मोठा आवाज आणि या गोळीचा सौम्य आघात यामुळे प्राणी हुसकावून लावण्यास मदत होते. ही बंदूक बनवण्यासाठी ज्ञानेश्वरला पाच  दिवस लागले तर 300 ते 400 रुपये खर्च आलाय. त्याच्या या छोट्याशा, कमी खर्चिक आणि गरजेवर आधारित प्रयोगाचं गावभर कौतुक होते आहे.


ज्ञानेश्वर लहानपणापासून प्रयोगशील असून त्याच्या या बालप्रयोगाचा वडिलांना देखील फायदा होत आहे. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्याच्या याच गरजेपोटी ज्ञानेश्वरला हा प्रयोग करण्यास भाग पाडलंय. मात्र यातून त्याच्या या छोट्याश्या आणि कमी खर्चिक असलेल्या प्रयोगाचे गावभर कौतुक होत आहे.


वर्ध्याच्या कासरखेड्यात शेतकऱ्याच्या लेकाची कमाल


शेतात पिकांच वन्यप्राण्यापासून संरक्षणासाठी शेतकरी लाकडी मचाण तयार करतात. पण ही मचाण पाहिजे तितकी सुरक्षित नसते. शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व अडचणी लक्षात घेत  शेतकऱ्यांना शेतात थांबण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलाने सुविधायुक्त मचाण तयार केले आहे. त्यात सुरक्षेचा विचार केला आहे. ही मचाण वन्य प्राण्यांना शेतात शिरकाव करण्यापासून रोखते. योगेशने केलेल्या या जुगाडची चर्चा सध्या सगळीकडे आहे.  मचाणची उंची 5 ते 6 फूट उंच आणि वजन जवळपास 550 किलो आहे. यावर विद्युतरोधक (Current Proof)  लावण्यात आले. तसेच वरील भागावर सोलर पॅनल लावला आहे. सोलरवर पंखा, लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. मचाणमध्ये रेडिओसारखी मनोरंजनाची तसेच मोबाईल चार्जिंगचीही सुविधा केली आहे. मचाणमध्ये दोन जण आरामात थांबू शकतात. यास झुला देखील लावलाय.  योगेशची मचाण पाहिल्यानंतर मचाणीची मागणी वाढली आहे.  शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, मचाण देणार असल्याचं योगेशन सांगितलं.