Jalna Crime News : जालना जिल्ह्यात (Jalna District) एक धक्कादायक घटना समोर आली असून, जन्मदाता वडील, भाऊ आणि अल्पवयीन मुलाने बाजरीच्या शेतात नेऊन एका तरूणाची हत्या (Murder) केली आहे. घरी नेहमीच वाद-विवाद करीत असल्याने या तरुणाचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहेत. विशेष म्हणजे या तरुणाची हत्या केल्यावर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. पण अंत्यसंस्कार सुरु असतानाच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि या घटनेचा भांडाफोड झाला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शिरनेर येथे बुधवारी सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. तर धर्मराज नारायण वैदय असे मयत मुलाचे नाव असून, नारायण शिवाजी वैदय, कर्णराज नारायण वैदय व एका 17 वर्षाचा अल्पवयीन मुलाला (सर्व रा. शिरनेर, ता. अंबड) संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत धर्मराज वैदय हा नेहमीच घरच्यांना शिवीगाळ करायचा. सोबतच घरातील सदस्यांसोबत वाद घालून नेहमी भांडण करायचा. त्याच्या या नेहेमीच्या सवयीमुळे कुटुंबातील सदस्य वैतागले होते. त्याला अनेकदा समज देऊन देखील त्याच्यात कोणतीही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे मंगळवारी सकाळच्या सुमारास धर्मराजचे वडील नारायण वैदय, भाऊ कर्णराज वैदय आणि एका अल्पवयीन मुलाने बाजरीच्या शेतात नेऊन त्याला काठीने जबर मारहाण केली. तर याच मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले
धर्मराजला करण्यात आलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे तीनही आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र याचवेळी या सर्व प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा मृतदेह जळत होता. त्यामुळे याबाबत पोलिसांनी नारायण वैदय, भाऊ कर्णराज वैदय यांची चौकशी केली. मात्र त्या दोघांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांना सर्व प्रकार संशयास्पद वाटले. म्हणून त्यांनी दोघांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी धर्मराजची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे धर्मराजला करण्यात आलेल्या मारहाणीनंतर काढलेला एक फोटोही पोलिसांच्या हाती लागला आहे. आरोपींनी खून केल्याची कबुली दिल्याची माहिती अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: