Jalna Crime News : जालना जिल्ह्यात (Jalna District) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, चुलत्यानेच कुऱ्हाडीने वार करून पुतण्याची हत्या (Murder) केली आहे. शेतातील बांधाच्या वादावरून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पुतण्याचा खून करणाऱ्या चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास मिसाळ असे मयत तरुणाचे नाव असून, शिवाजी जयाजी मिसाळ असे आरोपी चुलत्याचे नाव आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  जालन्यातील जानेफळ दाभाडी येथील शिवाजी मिसाळ आणि त्यांचा पुतण्या अंबादास मिसाळ यांचा गट क्रमांक 35  मधील जमिनीच्या बांधावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. तर दोघेही शेतात घर करून कुटुंबीयांसोबत राहतात. दरम्यान शुक्रवारी दोघांमध्ये बांध कोरण्यावरून किरकोळ वाद झाला होता. पण काही वेळात वाद शमला आणि अंबादास मिसाळ यांनी काकाच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली. काकाची समजूत काढल्यावर बाजूलाच असलेल्या घरासमोरील बाजेवर ते झोपले. याचवेळी संशयित शिवाजी मिसाळ याने अंबादास मिसाळ यांच्यावर अचानक कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यांच्या मानेवर व गळ्यावर गंभीर वार केले. यामध्ये अंबादास मिसाळ  यांचा जागीच जीव गेला. तर याची माहिती मिळताच नातेवाइकांनी अंबादास यांना तत्काळ राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृतघोषित केले. या घटनेची माहीती मिळताच हसनाबाद ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली पवार पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. 


दरम्यान याप्रकरणी मयताची पत्नी रेखा अंबादास मिसाळ यांच्या तक्रारीवरून संशयित शिवाजी मिसाळ, मंदाबाई शिवाजी मिसाळ यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि वैशाली पवार या करीत आहेत. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 


बांधावरून वाद अन् जीव गेला...


गावागावात शेतीवरून आणि शेतीच्या बांधावरून होणारे वाद कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. बांध कोरल्यावरून दोन गटात होणाऱ्या हाणामारीच्या शेकडो गुन्ह्याची राज्यात रोज पोलिसात नोंद होते. दरम्यान याच वादामुळे जालना जिल्ह्यातील खुनाची घटना घडली आहे. आरोपी शिवाजी मिसाळ आणि त्यांचा पुतण्या अंबादास मिसाळ यांची आजूबाजूलाच जमीन होती. दोघांचा एकच बांध असल्याने त्यांच्यात वाद व्हायचा. बांध कोरल्यावरून त्यांच्यात नेहमी शाब्दिक चकमक उडायची. दरम्यान शुक्रवारी देखील असाच काही वाद झाला होता आणि त्यानंतर शिवाजी मिसाळ यांनी आपल्या पुतण्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्याचा जीव घेतला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Jalna News : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात उद्यापासून जमावबंदी; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश