Jalna Accident: जालना शहरात (Jalna City) भीषण अपघात (Accident) झाला आहे. भरधाव आयशरने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (25 जून) रात्री जालना शहरातील मंठा-अंबड बायपास मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर घडली. दरम्यान अपघाताच्या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात हलवले, मात्र यात तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. नुरेन फातेमा सादेक शेख (वय 7 वर्षे), आयेजा फातेमा सादेक शेख (वय 5 वर्षे) अदाबिया फातेमा सय्यद शोएब (वत 9 वर्षे, सर्व रा. तद्वपुरा, जालना) अशी मृतांची नावे आहेत.


रविवारची सुट्टी असल्याने सय्यद शोएब हे आपल्या चिमुकल्यांसह साडूच्या लेकरांना घेऊन सायंकाळी पाचच्या सुमारास मोतीबागेत खेळण्यासाठी घेऊन गेले होते. लेकरांचे खेळणे झाल्यानंतर सय्यद शोएब खरेदीसाठी मॉलमध्ये घेऊन गेले. खरेदी झाल्यानंतर ते सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन घराकडे परतत होते. दरम्यान याचवेळी बायपास मार्गावरील उड्डाणपुलावर पाठीमागून येणाऱ्या आयशरने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात अदाबिया फातेमा सय्यद शोएब, नुरेन फातेमा सादेक शेख, आयेजा फातेमा सादेक शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर सय्यद शोएब आणि अन्य एक मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे यांनी दिली. 


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कदीम ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, उपनिरीक्षक नागरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नातेवाईक, नागरिकांच्या मदतीने जखमींसह मृतांना रुग्णवाहिकेतून तातडीने संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीअंती तिघांना मृत घोषित केले. अपघातग्रस्त सय्यद शोएब आणि अन्य एका मुलावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, रुग्णालय परिसरात मृत चिमुकल्यांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता.


रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश


सय्यद शोएब हे आपल्या चिमुकल्यांसह साडूच्या लेकरांना घेऊन सायंकाळी पाचच्या सुमारास मोतीबागेत खेळण्यासाठी घेऊन गेले होते. त्यानंतर मॉलमध्ये खरेदी करुन घरी जात असतानाच पाठीमागून येणाऱ्या आयशरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ज्यात त्यांची मुलगी अदाबियासह त्यांच्या साडूचे मुलं नुरेन आणि आयेजा यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान याची माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात डॉक्टरांनी तीनही चिमुकल्यांना मृत घोषित करताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत होता. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Jalna Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात; जखमी चालक दोन तास ट्रकमध्येच अडकून, अन्...