मुंबई राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)  मुद्दा चांगलाच गाजत आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील पुन्हा उपोषणाला बसले. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी तरुणाने आपले जीवन संपवले. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील  वरुडी येथे ही घटना घडली आहे.  या तरुणाने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहून टोकाचे पाऊल उचलले. विषारी औषध पिऊन त्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे जालन्यामध्ये खळबळ उडाली आहे. 


मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मागील एक वर्षापासून आंदोलन करत आहे मात्र सरकार दखल घेत नाही म्हणून मी आत्महत्या करत असल्याचे सांगत जालना जाल्ह्यात एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील वरुडी येथील दादाराव काकडे या 40 वर्षीय व्यक्तीने  विषारी औषध पिऊन राहत्या घरी आत्महत्या केलीय.  दरम्यान मयत काकडे यांच्या खिशात चिट्ठी सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


काय लिहिले आहे चिठ्ठीत?


मराठा आरक्षणासाठी मी माझे जीवन संपवत आहे. मनोज जरांगे पाटील मागील एक वर्षापासून उपोषण करत आहे. पण हे सरकार काही निर्णय घेत नाही, तरी मराठा आरक्षणासाठी मी आत्महत्या करत आहे. 


उपोषणाचा आज सातवा दिवस


मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. आंतरवाली सराटी इथं संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगेंची भेट  घेतली. जरांगेंची  काल पुन्हा एकदा त्यांची तब्येत खालावल्याच पाहायला मिळालं . रात्री बीपी डाऊन झाल्याने डॉक्टरांनी त्यांना उपचाराची विनंती केली मात्र त्यांनी उपचारास नकार दिला.


सह्याद्रीवर बैठक


मराठा आरक्षणाबाबत मंत्रीमंडळाच्या  बैठकीनंतर उपसमितीची आज महत्वाची बैठक होणार आहे.  सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी 2 वाजता बैठक होणार आहे. बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाईसह कायदेतज्ञ  उपस्थित राहणार आहेत.  हैद्राबाद गॅजेटची प्रत सरकारला उपलब्ध झाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रीया कशी राबवावी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.  


परभणीत मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात  


परभणीत मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.   पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची  झाली. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सलग दुसऱ्या दिवशीही  बंदचा नारा दिला होता.   मराठा समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून बंद  करत होते . पोलिसांनी  मराठा आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. 


हे ही वाचा :


कुणाच्यातरी ताटातलं काढून दुसऱ्याला वाढणार नाही, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही : शंभूराज देसाई