Jalna News: जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीचा (Gram Panchayat Election) धुराळा उडणार आहे. कारण जालना जिल्ह्यातील एकूण 39 ग्रामपंचायतींच्या 47 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. तर या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. तसेच 18 मे रोजी निवडणूक प्रक्रिया होणार असून, 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
राज्यातील राजकारण वेगवेगळ्या मुद्द्याने तापले असतानाच, जालना जिल्ह्यात ग्रामपंचायत पोट निवडणुका पार पडणार आहे. ग्रामपंचायत सदस्यांचे निधन, राजीनामा यासह इतर कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्यत्व, सरपंचपद रद्द झालेल्या राज्यातील ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तर यासाठी निवडणूक विभागाकडून देखील तयारी करण्यात आली आहे. तसेच जालना जिल्ह्यातील 39 ग्रामपंचायतींच्या 47 जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत.
कोणत्या तालुक्यातील किती ग्रामपंचायतसाठी निवडणूक
घनसावंगी तालुक्यातील गाढेसावरगाव येथील तीन जागांसाठी, प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होत आहे.
बदनापूर तालुक्यातील पीरसावंगी, म्हसला भातखेडा, विल्हाडी, कस्तुरवाडी, वाल्हा, चनेगाव, हिवराळा येथील प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होत आहे.
अंबड तालुक्यातील पारडा येथील दोन, खडकेश्वर, चंदनापुरी (बु.) येथील प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक होत आहे.
जालना तालुक्यातील सावरगाव हाडप, विरेगाव, गोंदेगाव, माळेगाव खुर्द, धानोरा, वडगाव वखारी, हातवन, राठोडनगर येथील प्रत्येकी एका जागेसाठी व तांदुळवाडी (बु.) येथील दोन जागांसाठी निवडणूक होत आहे.
परतूर तालुक्यातील सातारा वाहेगाव, माव पाटोदा व कोकाटे हादगाव येथील प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होत आहे.
मंठा तालुक्यातील तालुक्यातील पिंपरखेड खराबे येथील दोन, माळकिनी, आकणी, पांगरी खुर्द येथील एका जागेसाठी व जाफराबाद तालुक्यातील म्हसरूळ येथील एका जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे.
असा असणार निवडणूक कार्यक्रम
- अर्ज भरण्याची मुदत 25 एप्रिल ते 2 मे पर्यंत असणार
- नामनिर्देशनपत्र छाननी 3 मे रोजी होणार
- अर्ज मागे घेण्याची मुदत 8 मे रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत असणार
- निवडणूक चिन्ह वाटप 8 मे रोजी दुपारी 3 नंतर केले जाणार
- गरजेनुसार 18 मे रोजी मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.
- 19 मे रोजी मतमोजणी करून निकाल दिले जाणार आहेत.