Jalna District Curfew : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी (Kunbi Certificate) उभारलेल्या आंदोलनात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी 26 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात (Ambad Taluka) संचारबंदी ( Curfew) लावण्यात आली होती. मात्र, आता संचारबंदी अंबड शहरापुरती शिथिल करण्यात आली आहे. मध्यरात्री 12 वाजता ही संचारबंदी शिथिल केल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. दरम्यान, शहर वगळता तालुक्यातील ग्रामीण भागात ही संचारबंदी कायम असणार आहे. 26 फेब्रुवारीच्या मध्यरात्री पासून जालना जिल्ह्यातील (Jalna District) संपूर्ण अंबड तालुक्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आले होते.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे यांनी गंभीर आरोप केले होते. तसेच, फडणवीस यांना आपला जीव घ्यायचा असून, मी स्वतःच त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन आपला जीव द्यायला तयार असल्याचे म्हणत जरांगे मुंबईकडे निघाले होते. यावेळी शेकडो मराठा आंदोलक त्यांच्यासोबत मुंबईकडे निघाले होते. जरांगे यांच्या याच आक्रमक भुमिकेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी अंबड तालुक्यात कलम 144 (2) प्रमाणे संचारबंदी आदेश लागू केले होते. मात्र, आता संचारबंदी अंबड शहरापुरती शिथिल करण्यात आली आहे.  विशेष म्हणजे शहर वगळता तालुक्यातील ग्रामीण भागात ही संचारबंदी कायम असणार आहे.


पहिल्या टप्प्यात अंबड शहरातील संचारबंदी उठवण्यात आली


जिल्हाधिकारी यांनी अंबड तालुक्यात संचारबंदी लावण्याचे आदेश काढल्याने सर्वत्र रस्ते निर्मनुष्य झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अंबड शहरात देखील अशीच काही परिस्थिती होती. अनेक दुकाने बंद होती. नागरिक घराबाहेर निघत नव्हते. त्यामुळे याचा फटका नागरिकांना बसत होता. अंबड शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, तालुक्यातील सर्व मुख्य व्यवहार अंबड शहराशी जोडलेले आहेत. तसेच, जरांगे देखील छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल झाल्याने आंतरवाली येथे होणारी मराठा आंदोलकांची गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे आता टप्प्या-टप्प्याने संचारबंदी उठवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या टप्प्यात अंबड शहरातील संचारबंदी उठवण्यात आली आहे. 


संचारबंदी आदेशात काय म्हटले होते? 


मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनास पाठींबा देण्यासाठी तसेच जरांगे पाटील यांनी मुंबईला जावू नये याकरीता आग्रही असल्याने अंतरवाली सराटी येथे मोठया प्रमाणात गर्दी जमण्याची शक्यता असून, त्यामुळे धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व तालुक्यातील इतर मार्गावर मोठया प्रमाणावर गर्दी जमून दळणवळण विस्कळीत होण्याची, सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत होण्याची, गर्दीमुळे सार्वजनिक शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण अंबड तालुक्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सदरील संचारबंदी आदेश दुकाने, आस्थापना यांनाही लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात म्हटले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील आंबड तालुक्यात संचारबंदी